दि.०२(पीसीबी) – ‘ज्यांनी गायीचा प्रतिपाळ केला, त्यांना दुधासह आयुर्वेदिक महत्त्व असलेले पंचगव्य देणारी गाय ही सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे!’ असे विचार विश्व हिंदू परिषद मुंबई व कर्णावती क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे यांनी चिंचवडगाव येथे मंगळवार, दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत गोरक्षा एवंम गोसंरक्षण, सेवा, समरसता व धर्मप्रसार या आयामामधील जिल्हा प्रमुख आणि जिल्हा सहमंत्री यांच्यासह पिंपरी – चिंचवड, कात्रज, सिंहगड, पर्वती आणि विद्यापीठ भागातील सामाजिक पुंजातील सेवा, समरसता, गोरक्षा एवंम गोसंरक्षण, धर्मप्रसार व प्रसार या आयामाचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना भाऊराव कुदळे बोलत होते. याप्रसंगी समरसता पुनरुस्थान गुरुकुलम् अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, नितीन वाटकर, प्रांत गोरक्षा सहप्रमुख भानुदास बर्गे, केतन घोडके, दिनेश लाड, डाॅ. शर्वरी यरगट्टीकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
भाऊराव कुदळे पुढे म्हणाले की, ‘गाय वाचली तर शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तर गाय वाचेल; कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. गायीच्या दुधासह गोमूत्र यांपासून निर्माण होणाऱ्या पंचगव्यातून सुमारे १०९ प्रकारची औषधे तयार केली जातात. यासाठी सेवा विभागाने एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात बैठकीचे आयोजन करून गायी पाळणाऱ्या शेतकऱ्याला सन्मानित करावे. मुस्लीम समाजातील काही व्यक्तींनीही गोशाळा उभारल्या आहेत; कारण जातपात, धर्म या सर्व भेदांच्या पलीकडे सर्वांना गोपालनाचे अनेक लाभ होतात म्हणून गाय हे खऱ्या अर्थाने समरसतेचे प्रतीक आहे!’
कै. वसंत सराफ आणि कै. अरविंद विभुते यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ॲड. सतिश गोरडे यांनी प्रास्ताविकातून सामाजिक पुंज आयामाचे कार्य व उद्देश याबाबत सविस्तर माहिती देऊन त्याची पूर्तता आपल्या जिल्ह्यातून व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. नितीन वाटकर यांनी सेवा समरसतेद्वारे आपण समाजातील विविध समस्या जाणून सेवा देऊ शकतो असे प्रतिपादन केले. यावेळी डॉ. शर्वरी यरगट्टीकर, समरसता प्रांत प्रमुख निखिल कुलकर्णी, गोरक्षा एवंम गोसंरक्षण प्रांत सहप्रमुख भानुदास बर्गे, धर्मप्रसार प्रांत संचातील अमर सातपुते, प्रचार – प्रसार प्रांत सहप्रमुख संजय गोडबोले आणि निनाद गायकवाड यांनी आयामाची माहिती दिली. यावेळी मान्यवरांसह सहभागी कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप गोशाळेची पहाणी केली. विभाग सहमंत्री दिनेश लाड यांनी सूत्रसंचालन केले. अतुल सराफ यांनी आभार मानले.











































