दि.०२(पीसीबी)-साहित्य, इतिहास आणि कामगार चळवळीतील उल्लेखनीय योगदानासाठी साहित्यिक व कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांना आयफिया (IFEA) हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.नवी दिल्ली येथील असोसिएशन फॉर अवेरनेस ऑफ अप्लाइड रिसर्च या संस्थेच्या वतीने साहित्य, इतिहास आणि कामगार चळवळ या क्षेत्रातील दीर्घकाळ केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी अरुण बोऱ्हाडे यांना ‘आयकॉनिक फेलिसिटेशन ऑफ एक्सेम्प्लरी अचिव्हमेंट’ (IFEA) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
देशपातळीवरील हा सन्मान नवी दिल्ली येथे एका समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.अरुण तुकाराम बोऱ्हाडे यांच्या कामगार चळवळीतील पंचवीस वर्षांचे योगदान, इतिहासातील अनेक घटनांचा सखोल अभ्यास, तसेच विविधांगी साहित्यलेखन आणि साहित्य चळवळीतील सुमारे पस्तीस वर्षांचा लेखाजोखा याचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. १९९२ मध्ये इलेक्ट्रोसॉफ्ट वर्कर्स फेडरेशनच्या अध्यक्षपदापासून त्यांच्या कामगार चळवळीचे कार्य सुरू झाले. पुढे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कामगार संघटनेचे त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले. २००३ मध्ये एच. ए. कंपनीसाठी केलेले आंदोलन देशभर गाजले होते. तसेच सेंच्युरी एन्का, बजाज ऑटो, फोर्स मोटर्स इत्यादी कंपन्यांतील लढ्यांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.
चाकण औद्योगिक क्षेत्रात अनेक कंपन्यांतील कामगारांना त्यांनी न्याय मिळवून दिला. अरुण बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एच. ए. कामगार लढ्यावर जमशेदपूर येथील प्रा. शामसुंदर यांनी त्यावेळी प्रबंध लिहिला होता.२०१८ मध्ये पिंपरी – चिंचवडमध्ये संघटित व असंघटित कामगारांची पहिली कामगार परिषद भरविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यावेळी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांवर पहिल्यांदाच चर्चा झाली होती. त्या परिषदेचे पडसाद संसदेतही उमटले होते. २००६ आणि २०११ मध्ये कोलकत्ता येथील राष्ट्रीय औषध निर्माण प्रतिनिधी परिषदेत त्यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
अरुण बोऱ्हाडे यांना इतिहासाची आणि गिर्यारोहणाची आवड असून महाराष्ट्रातील २०० हून अधिक गडकिल्ले त्यांनी पाहिले आहेत. त्यावरही त्यांनी लेखन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमेवर त्यांचा विशेष अभ्यास असून, त्या विषयावर त्यांचे ‘जिंजी, वेल्लोर, तंजावर’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळात ते सक्रिय आहेत.
त्याचबरोबर साहित्य क्षेत्रातील त्यांनी दिलेले भरीव योगदान या पुरस्कारासाठी विचारात घेण्यात आले आहे. १९८९ ते १९९९ दरम्यान महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी – चिंचवडचे ते कार्यवाह होते. १९९२ मध्ये कामगार साहित्य परिषद स्थापन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला; तसेच त्यांनी परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले. तेव्हापासून विविध संस्थांच्या माध्यमातून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. अलीकडे पाच वर्षांपूर्वी त्यांनी इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना केली. मोशी येथे चार साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन केले. त्यांची एकूण सोळा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या ‘राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा’ या पुस्तकाला संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. विविध विषयांवर त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. विविध वृत्तपत्रांतून ते स्तंभलेखन करीत असतात. एक अभ्यासू, समर्पित आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व असलेल्या बोऱ्हाडे यांच्या सर्व कामगिरीचा या सन्मानासाठी विचार करण्यात आला आहे.











































