दि.०२(पीसीबी)- महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या कार्याध्यक्षा तसेच महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कथाकार विनीताताई ऐनापुरे यांचे अल्पशा आजाराने काल दुःखद निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या. दूरदर्शनवर झालेली चंद्र आहे साक्षीला ही मालिका त्यांच्या कथेवर आधारित असून ती लोकप्रिय होऊन गाजली होती.
त्यांना कथा तिच्या या पुस्तकांसाठी महाराष्ट्र राज्याचा एक लाख रुपये चा पुरस्कार मिळाला होता.१९८० पासून त्यांनी लेखनाला सुरवात केली, प्रामुख्याने कथा-कादंबरी लेखन यामध्ये त्यांच्या आजवर १३ कथासंग्रह, ८ कादंबऱ्या व ३ चरित्र प्रसिद्ध झाली आहे. ‘स्त्रीदला’ या त्यांच्या कथासंग्रहाला तीन पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ह्यांचा ‘कै. शरद्चंद्र चिरमुले उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार’, यशवंतराव दाते स्मृती संस्था, वर्धा यांच्यातर्फे दिला जाणारा ‘सहकार व शिक्षणमहर्षी बापूराव देशमुख उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार’, तसेच, बारामती येथील ‘कथाकार विभावरी शिरूरकर राज्यस्तरीय कथाभूषण’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते.
गोव्याच्या दवबिंदू ह्या संस्थेतर्फे झालेल्या ‘धाकटीचं लग्न ह्या कथेला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता ‘झाली भली पहाट’ ह्या कथेवरील दूरदर्शनवर झालेले नाटक उत्कृष्ट नाटक म्हणून गौरवण्यात आले होते, ‘शेजाऱ्यांना मदत करा’ ह्या कथेला कै. दादा कोंडके विनादी कथा स्पर्धा, कलागौरव ह्यांच्यातर्फे प्रथम क्रमांक मिळाला. त्यानंतर अनेक कथांना सतत पुरस्कार लाभले. ‘वीणा’ या कादंबरीला कोमसापचा कै. र. वा. दिघे स्मृती पुरस्कार प्राप्त झाला.‘पदरी आलं आभाळ ’या कादंबरीला कै. शांता शेळके उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला असून त्यावरही दूरदर्शन मालिका सादर झाली आहे.नराधम ह्या कादंबरीवर आधारित कुसुम मनोहर लेले या नाटकाने रंगभूमी गाजवून सोडली. ह्या नाटकाचे हिंदी, गुजरा थी भाषांमध्येही प्रयोग झाले.














































