हायकोर्टाचा मोठा निर्णय मतमोजणी आता २१ डिसेंबरला होणार!

0
2

दि.०१(पीसीबी)-राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांवर आज मोठी घडामोड झाली आहे. नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार उद्याची मतमोजणी रद्द करण्यात आली असून सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी, म्हणजे २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

काही नगरपरिषदांच्या प्रलंबित न्यायालयीन प्रक्रियेमुळे जवळपास २० ठिकाणांची निवडणूक पुढे ढकलावी लागली होती. त्यामुळे संपूर्ण निकाल प्रक्रियेवर परिणाम होऊ नये, यासाठी सर्व मतमोजणी एकाच दिवशी घेण्याची मागणी कोर्टात करण्यात आली होती. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून अखेर हा निर्णय दिला.यासोबतच एक्झिट पोल २० डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासानेच जाहीर करण्यास परवानगी दिली आहे. आचारसंहिता देखील २० डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे.

उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, तिथे जुनीच निवडणूक चिन्हे कायम राहतील, मात्र खर्च मर्यादा वाढवण्याबाबतची मागणी कोर्टाने फेटाळली आहे.दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “मतमोजणी पुढे ढकलणे ही प्रक्रिया त्रुटी दर्शवते. आयोगाने सुधारणा करण्याची गरज आहे. अशा प्रकारची परिस्थिती मी पहिल्यांदाच पाहत आहे.”असं मत व्यक्त केलं आहे

२१ डिसेंबरला निकाल ढकलल्यामुळे नक्की काय परिणाम होणार ?

सर्व स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्रे २१ डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावी लागणार.

निवडणूक २८० हून अधिक ठिकाणी असल्याने मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आवश्यक.

ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये असताना अधिकाऱ्यांची दैनिक तपासणी व स्वाक्षरी ही प्रक्रिया अविरत सुरू राहील.

विधानसभा निवडणुकीइतकीच मोठी मतमोजणी व्यवस्था या निवडणुकीत निर्माण झाली आहे, पण कालावधी मात्र तब्बल तीन आठवडे वाढला आहे.

यामुळे प्रशासकीय यंत्रणेला अधिक मनुष्यबळ, वेळ आणि खर्च झेलावा लागणार आहे.