राज्यातील २४ नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या त्यावर आयोगाने दिले स्पष्टीकरण

0
4


दि.०१ (पीसीबी) – राज्यातील अनेक नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्ष पदाच्या २४ नगरपालिका आणि सुमारे १५० प्रभागांतील नगरसेवक निवडणुका अचानक पुढे ढकलण्यात आल्या. मतदानाच्या आदल्या दिवशीच हा निर्णय जाहीर झाल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्वामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.निवडणुका स्थगित करण्यामागे राज्य सरकारचा हस्तक्षेप असल्याचा आरोप विरोधकांनी केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निर्णय “गोंधळ निर्माण करणारा” असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र, या सर्व आरोपांवर राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

आयोगातील सूत्रांनुसार, कायदेशीर बाबींच्या पार्श्वभूमीवर आणि काही उमेदवारांनी दाखल केलेल्या अपिलांवर 17(1)(ब) तरतुदीनुसार अर्ज मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ देणे बंधनकारक होते.जर हे पाळले नसते तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाला असता, अशी माहिती आयोगाने दिली.यामुळे, निवडणुकीतील गोंधळ टाळण्यासाठी काही नगरपालिकांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

आयोगाने नियम ‘क’ आणि ‘ड’ लागू करून सर्व स्थगित निवडणुकांसाठी नवा कार्यक्रम निश्चित केला आहे.
याचबरोबर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या प्रचार खर्चाबाबतचा निर्णय अद्याप विचाराधीन असून याबाबत राजकीय पक्षांसोबत बैठकही पार पडली आहे.

नवीन उमेदवारांना संधी नाही फक्त अर्ज मागे घेता येणार

 

➤ नवीन उमेदवार अर्ज भरू शकत नाहीत

➤ फक्त आधी दाखल केलेले अर्ज मागे घेता येणार

➤ चिन्हवाटप पुन्हा गरजेनुसार करण्यात येणार

जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आला असून काही ठिकाणी कारणे दाखवा नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू आहे.अनेक नगरपालिकांमध्ये कार्यकर्ते महिनाभर प्रचार करत असताना निवडणुका पुढे ढकलल्याने त्यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे.
उमेदवारही अस्वस्थ झाले असून खर्च, वेळ आणि राजकीय समीकरणे पुन्हा मोजावी लागणार आहेत.