अनगर नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित,उज्ज्वला थिटेंना अर्ज दाखल करता येणार नाही

0
9


दि.०१(पीसीबी)-सोलापूर जिल्ह्यातील अनगर आणि मंगळवेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुका अचानक स्थगित झाल्या आहेत. या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने नव्याने वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.अनगर नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांनी या स्थगितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. “न्यायालयाने आमचा अर्ज फेटाळला असला तरी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. तोपर्यंत निवडणूक स्थगित ठेवावी, अशी मागणी मी करणार आहे,” असे थिटे यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या अर्जास आलेले तांत्रिक अडथळे आणि निवडणूक प्रक्रियेत होणाऱ्या अन्य अडचणींवरही भर दिला.

प्रशासनाच्या माहितीनुसार, उज्ज्वला थिटे यांना आता अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध नाही. या परिस्थितीत, अनगर नगरपंचायतीसाठी एकमेव अर्ज दाखल केलेली प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून घोषित होणार आहे. जर प्राजक्ता पाटील यांनी अर्ज मागे घेतला नाही, तर निवडणूक आयोगाकडे फक्त एक अर्ज शिल्लक राहील आणि त्यानंतर अधिकृतपणे त्यांची निवड बिनविरोध जाहीर केली जाईल.

उज्ज्वला थिटे यांनी आपल्या विधानात म्हटले, “अर्ज दाखल करण्यासाठी अनेक अडथळे आले, परंतु आम्ही न्यायालयात लढू आणि जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत निवडणूक स्थगित राहावी.” या स्थगितीमुळे जिल्ह्यातील नागरिक आणि पक्षप्रमुख यांच्यात चर्चा सुरू आहे, आणि निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.