राणे बंधूंमधील वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

0
6

दि.०१ (पीसीबी)-नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्याला कारण आहे ते कुडाळ-मालवण या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार असलेले निलेश राणे यांनी भाजपवर विशेषतः रवींद्र चव्हाण यांचे नाव घेत पैसे वाटपाचे आरोप केले. यानंतर आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय?, आमच्या पक्षाची कोणी बदनामी करू नये. प्रत्येकाचे व्यवसाय आहेत. जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार हमाम मैं सब नंगे है, असं म्हणत मंत्री आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी निलेश राणेंना प्रत्युत्तर दिले. यानंतर कोकणात राणे बंधूंमध्ये सतत संघर्ष होत असताना पाहायला मिळत आहे. राणे बंधूंमधील वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

राणे विरुद्ध राणे असं होणं योग्य नाही. मी बरोबर असलेल्याच्या बाजूने आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंची पाठराखण केली असेल. मी मात्र जो योग्य आहे, त्याच्याच बाजूने आहे. दोघांच्याही बाजूने मी असेनच, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदमध्ये भारतीय जनता पक्ष पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरामधून त्यांनी थेट फेसबुक लाईव्ह करत कार्यकर्त्याच्या घरी असलेले पैसे देखील दाखवले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने पैसे वाटत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना लक्ष केला आहे. कार्यकर्त्याच्या घरी घुसल्याच्या प्रकरणांमध्ये निलेश राणे यांच्यावरती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान संपूर्ण प्रकरणांमध्ये शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. निलेश राणे यांना या प्रकरणांमध्ये एकटे पाडले जात असल्याचा आरोप त्यांचे धाकटे बंधू, कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी शिवसेनेवर केला आहे.