शिंदेसेनेचे आमदार शहाजीबापुंच्या कार्यालयावर छापा

0
3

दि.०१(पीसीबी)-गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचे नेते एकमेकांवर चिखलफेक करताना दिसून येत आहेत. मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरावर धाड टाकत शिंदे सेनेचे आमदार निलेश राणेंनी पैसे वाटपाचा आरोप केला होता. दरम्यान आता शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजाबापू पाटील यांच्या कार्यलयावर आयोगाच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा छापामारी केली. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील शिंदेसेना-भाजप पक्षांमध्ये सुरु असणारा वाद चिघळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाटील यांची जाहीर सभा संपताच आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई केल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे. पाटील यांच्या कार्यालयाची एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान कार्यालयाची झाडा जडती घेण्यात आली असून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे. या कारवाईचे नेमके कारण आणि पुढील तपशील अद्याप गुलदस्त्यात आहेत.