किवळे, मामुर्डी, रावेत भागात उद्यान, रस्ते, विरंगुळा केंद्रांची सुविधा पुरवा – आमदार शंकर जगताप
- कल्पतरू सोसायटी, काळेवाडी एम.के. चौकातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार- आमदार शंकर जगताप*
मिसिंग लिंक भूसंपादन, निधी तरतुदीबाबत प्रशासनाला आमदार शंकर जगताप यांच्याकडून निर्देश
पिंपरी, 28 नोव्हेंबर (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदार संघातील पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटी येथे अंडरपास आणि काळेवाडी येथील एम. के. चौक येथे ग्रेड सेपरेटर तयार करून या भागामध्ये वाहतूक सुविधा सक्षम करणे गरजेचे आहे. या रस्त्यांचा आराखडा, आवश्यक भूसंपादन आणि विविध कामांच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि . 28) आमदार शंकर जगताप यांची महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर बैठक पार पडली. आगामी काळात हे अंडरपास, ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच या भागातील मिसिंग लिंक जोडून नागरिकांना पर्यायी वाहतूक रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. दरम्यान यावेळी पवना सुधार प्रकल्प, उड्डाणपूल, अंडरपास यांसाठी निधीची तरतूद करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेल्या भागांमध्ये उद्यान, रस्ते, विरंगुळा केंद्रे, नागरी सुविधा केंद्र विकसित करणे यांसारख्या मुद्द्यांवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त दालनामध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार शंकर जगताप यांनी विविध मुद्द्यांवर प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
याबाबत माहिती देताना आमदार शंकर जगताप म्हणाले चिंचवड मतदार संघातील वाहतुकीची कोंडी, पिंपळे सौदागर पीके चौक येथील उड्डाणपूल, स्वराज्य चौक, काळेवाडी एम के चौक येथील ग्रेड सेपरेटर, तसेच या भागातील रस्ता रुंदीकरण आणि पायाभूत सोयी सुविधांच्या कामाबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
या संदर्भात आमदार शंकर जगताप यांनी सांगितले, आगामी काळात चिंचवड मतदार संघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्राधान्याने अग्रक्रम दिला जाणार आहे. पिंपळे गुरव, सौदागर, काळेवाडी, रहाटणी या भागात उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि अंडरपास असे सक्षम पर्याय उभे केले जाणार आहेत. याशिवाय चिंचवड मतदार संघातील मिसिंग लिंक जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये पवना नदीच्या कडेला असणाऱ्या संत गार्डन सोसायटी ते काळेवाडी पुलाकडील 18 मीटर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम 90% पूर्ण झाले आहे. मोरया स्टेडियमकडून काळेवाडी पुलाकडे जाणाऱ्या 100 मीटर रस्त्याचे काम, मोरया गोसावी क्रीडांगणाकडून काकडे टाऊनशिपकडे जाणाऱ्या 12 मीटर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बटरफ्लाय ब्रिजकडून केशवनगर मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या 18 मीटर रस्त्याचे काम, वाकड येथील सर्वे क्रमांक 116 उत्कर्ष चौथी काम अंतिम टप्प्यात आहे. वाकड येथील टीप टॉप इंटरनॅशनल हॉटेलच्या मागील गोल्ड फिंगर सोसायटी लगतचा भाग जोडल्यानंतर वाहतूक कोंडीचा मुख्य अडथळा दूर होणार आहे.
………
उद्यान, रस्ते व विरंगुळा केंद्रांची नागरिकांना सुविधा द्या
आजच्या बैठकीमध्ये आमदार शंकर जगताप यांनी किवळे, मामुर्डी, रावेत यांसारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासीकरण झाले आहे. वाढत्या नागरीकरणाला पुरेशा प्रमाणात मूलभूत सुविधा पुरवणे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या भागात आरक्षण विकसित करून नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश आमदार शंकर जगताप यांनी दिले आहेत. यामध्ये उद्यान, रस्ते, विरंगुळा केंद्र यांसारख्या गोष्टींचा समावेश करावा अशाही सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
………………………….
पवना नदी सुधार प्रकल्पाला चालना देण्याचे निर्देश
पवना नदी सुधार प्रकल्पाला चालना देण्याचे निर्देश आजच्या बैठकीत आमदार शंकर जगताप यांनी महापालिकेला दिले आहेत. शहरातून वाहणारी पवना नदी शहराची आरोग्यवाहिनी आहे. नदीचे आरोग्य सुस्थितीत असणे हे निरोगी शहराचे लक्षण आहे. त्यामुळे पवना नदी सुधार प्रकल्पाला चालना देण्याचे काम प्राधान्याने हाती घ्या अशी सूचना देखील आमदार जगताप यांनी यावेळी केली. यामध्ये निधीबाबत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू असे देखील आमदारांनी यावेळी सांगितले.
………….
चिंचवड मतदार संघातील विविध प्रश्नांसंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निर्देश दिले आहेत. मुख्य म्हणजे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागातील उड्डाणपूल, अंडरपास या सुविधांमधून वाहतुकीला सक्षम पर्याय उपलब्ध करणे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यातील 12 मीटर रस्त्यांच्या बाबत असणारे अडथळे दूर करणे, वेगाने विकसित होणाऱ्या भागांमध्ये जास्तीत जास्त उद्याने, चांगले रस्ते, विरंगुळा केंद्र, नागरी सुविधा केंद्र विकसित करून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे यांसारख्या कामांबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
शंकर जगताप
आमदार, भाजपा पिंपरी चिंचवड शहर
……..














































