दि. २८(पीसीबी)-गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे. राज्यात सलग दुसऱ्यांदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी सत्ताधाऱ्यांची कास धरली आहे. विशेष बाब म्हणजे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अनेक दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीला गळती लागण्यामागची कारणे काय? त्याविषयीचा हा आढावा…
अनेकांनी धरली महायुतीची कास
दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील ४७ पराभूत उमेदवारांनी सत्ताधारी महायुतीत प्रवेश केला आहे. त्यातील २६ उमेदवारांनी भारतीय जनता पक्ष आणि १३ जणांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कास धरली आहे. उर्वरित सात उमेदवारांनी शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्याशिवाय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी उमेदवारानेही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे विरोधकांच्या महाविकास आघाडीसमोरील अडचणींत मोठी वाढ झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत काय घडले होते?
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यातील २८८ पैकी तब्बल २३५ मतदारसंघांत दणदणीत विजय मिळवला होता. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या, तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाने ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४१ जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. दुसरीकडे विरोधकांच्या महाविकास आघाडीला केवळ ५० जागांवरच विजय मिळवता आला. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २० जागा आणि काँग्रेसला १६ जागांवर समाधान मानावे लागले. उर्वरित १० जागांवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले.
महाविकास आघाडीला गळती का लागली?
पक्षांतराचा सर्वाधिक फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसला. शिवसेनेचे पारंपरिक गड मानल्या जाणाऱ्या अनेक मतदारसंघांतील उमेदवारांनी भाजपाची कास धरली. विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविल्यानंतरही महायुतीतील पक्षांनी आपले गड आणखीच मजबूत करण्याचे प्रयत्न केले. “विरोधकांचे उमेदवार आपल्या पक्षात आणल्याने अनेक उद्दिष्टे साध्य होतात. उपविजेत्यांना खेचून घेतल्याने विरोधी पक्षाची परत लढण्याची शक्यता संपुष्टात येते आणि ते आणखीच कमकुवत होतात. काही जागांवर सत्ताधारी महायुतीने अशा भागांतील नेत्यांना पक्षात घेतले आहे, जिथे त्यांच्या मित्रपक्षांनी विजय मिळवला आहे”, असे अजित पवार यांच्या पक्षातील एका नेत्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ही तयारी असल्याचे या नेत्याने स्पष्ट केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाला सर्वात जास्त फटका
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये पक्षांतराचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील १९ नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या १३ पराभूत उमेदवारांनी आणि काँग्रेसच्या १० उमेदवारांनी महायुतीची कास धरली आहे. त्याव्यतिरिक्त तीन अपक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचा एक उपविजेता उमेदवारही महायुतीत सामील झाला आहे. काटोल विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार सलील देशमुख यांनी गेल्या आठवड्यात पक्षाचा राजीनामा दिला आहे; परंतु त्यांनी अद्याप आपली पुढील योजना जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही.
प्रदेशनिहाय पक्षांतराचा आढावा
मराठवाड्यातील महाविकास आघाडीच्या १६ पराभूत उमेदवारांनी महायुतीत प्रवेश केला आहे. त्यातील आठ नेते भाजपात, पाच नेते अजित पवार गटात व तीन नेते शिवसेना शिंदे गटात सामील झाले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या एकूण ११ पराभूत उमेदवारांनी महायुतीची कास धरली आहे. त्यातील १० उमेदवार भाजपात आणि एका जणाने अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. कोकण हा एकसंध शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात होता. या बालेकिल्ल्यातही महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. कोकणातील पाच पराभूत उमेदवारांनी भाजपात, तिघांनी शिंदे गटात व दोन उमेदवारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.
पक्षांतरानंतर ठाकरे गटाचा संताप
विधानसभा निवडणुकीतील अनेक उपविजेत्या उमेदवारांनी महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे. “भारतीय जनता पक्षात प्रभावशाली नेते नाहीत. त्यांना निवडणूक लढविण्यासाठी इतर पक्षांमधून उमेदवार आयात करावे लागतात. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी आणि सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणला जातो. भाजपा भ्रष्टाचारी नेत्यांचा पक्ष झाला आहे”, अशी टीका ठाकरे गटाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी केली आहे.
शिंदे आणि पवार गटाची ताकद वाढली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे लक्ष सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर असल्याचे दिसून येत आहे. या भागातील आपले गड मजबूत करण्याचा अजित पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. मराठवाड्यातील पाच आणि पश्चिम महाराष्ट्रातील चार उपविजेत्या उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामधील सहा उमेदवार शरद पवार यांच्या पक्षाचे, तीन उमेदवार काँग्रेसचे व दोन उमेदवार ठाकरे गटातील आहेत. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या उपविजेत्या उमेदवारांमध्ये तीन कोकणातील आणि दोन मराठवाड्यातील आहेत. या पाचही उमेदवारांनी शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. शिंदे गटात सामील झालेले इतर पक्षातील नेते राज्याच्या विविध जिल्ह्यांतील आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यानंतर महाविकास आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठी कसोटी लागणार आहे.










































