तब्बल 20 लहान मुलांना कुलूप लावून अंगणवाडीत कोंडले

0
7

दि.२७(पीसीबी)-पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अत्यंत बेजबाबदार कृत्यामुळे सध्या हिंजवडीत मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. हिंजवडी येथील अंगणवाडीमधील सेविका आणि मदतनीस यांनी तब्बल 20 लहान मुलांना कुलूप लावून अंगणवाडीत कोंडून ठेवल्याची बाब समोर आली आहे.

याचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष बाब म्हणजे अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस या लहान मुलांना कोंडून स्वतः ग्रामपंचायतीच्या एका बैठकीसाठी निघून गेल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.
बुधवारी २६ नोव्हेंबर दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. अंगणवाडीतील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना ग्रामपंचायतीतील माजी सरपंचाने बोलावलेल्या एका बैठकीला जायचे होते. त्यावेळी अंगणवाडीची वेळ सुरु होती. या अंगणवाडीतील मुलांची योग्य व्यवस्था न करता, त्यांनी मुलांना अंगणवाडीच्या खोलीत बंद केले. त्यांना बाहेरून कुलूप लावून त्या निघून गेल्या. साधारण तासभर ही लहान मुलं त्या खोलीत बंद होती. यावेळी भीतीपोटी आणि एकटेपणामुळे ते मोठमोठ्याने रडू लागले.

या घटनेचा व्हिडिओ आज समोर आला असून मुलांचा आक्रोश पाहून पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणी अंगणवाडीतील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना विचारले असता त्यांनी माजी सरपंचांनी बैठकीला बोलावले म्हणून आम्ही कुलूप लावले,” असा बेजबाबदार खुलासा केला आहे. हा प्रकार लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना माहिती दिली.

त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अधिकारी गिराम यांनी तात्काळ सेविका आणि मदतनीस यांना बैठक सोडून अंगणवाडीचे कुलूप खोलण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानंतर या कर्मचाऱ्यांनी परत येऊन कुलूप उघडले आणि मुलांना मोकळे केले.
अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह

दरम्यान लहान मुलांना अशा प्रकारे कोंडून ठेवणे हे त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक होते. कारण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या बचावाचा मार्ग नव्हता. हा सरकारी बाल विकास योजनांच्या नियमांचे उल्लंघन करणारा गंभीर प्रकार आहे. सध्या तरी याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र या घटनेमुळे अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.