पिंपरी, दि. २६ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी भूमिपुत्र पुरस्कार प्रदान सोहळ्याने इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी साहित्यिक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई, किल्ला नियतकालिकाचे संपादक रामनाथ आंबेरकर, संमेलनाध्यक्षा डॉ. सीमा काळभोर, स्वागताध्यक्ष नीलेश बोराटे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे, परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते विराज लांडगे (क्रीडा), प्रा. डॉ. अमित तापकीर (शैक्षणिक), सुचेता घिगे (प्रशासन), विजय चव्हाण (साहित्य), मानसी मोकाशी (वास्तुविशारद), ॲड. सतीश गोरडे (विधीसेवा), डॉ. बी. एन. चव्हाण (शैक्षणिक), स्मिता बोऱ्हाडे (व्यक्तिमत्त्व विकास), ह. भ. प. गोरक्षनाथ उदागे (समाजप्रबोधन), शंभूदादा पवार (सामाजिक कार्य) या भूमिपुत्रांना सन्मानचिन्ह, वारकरी उपरणे, मानधन आणि गुलाबपुष्प प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी जयगणेश बॅंक्वेट हॉलचे मालक गणेश सस्ते आणि इंद्रायणी साहित्य परिषदेचे सचिव रामभाऊ सासवडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांनी मनोगतातून, ‘इंद्रायणीच्या काठावर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह अनेक दिग्गज साहित्यिक होऊन गेले. छत्रपती संभाजीमहाराज यांनी इंद्रायणी काठावर आपला देह ठेवला; तर श्री नागेश्वरमहाराजांचा आध्यात्मिक वारसा या परिसराला लाभला आहे. या देदीप्यमान संस्कृतीचे संचित वेगवेगळ्या कार्याच्या माध्यमातून जतन अन् संवर्धन करणार्या भूमिपुत्रांना सन्मानित करताना कृतज्ञतेची भावना आहे!’ अशी भूमिका मांडली. डॉ. बी. एन. चव्हाण आणि स्मिता बोऱ्हाडे यांनी पुरस्कारार्थींच्या वतीने प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केलीत.
प्रकाश अकोलकर यांनी, ‘गेल्या दहा वर्षांत देशात आणीबाणीसदृश्य परिस्थिती आहे. अशावेळी दुर्गा भागवत यांची प्रकर्षाने आठवण येते!’ असे विचार मांडले. जतिन देसाई यांनी, ‘साहित्यिक आणि पत्रकार जेव्हा व्यवस्थेच्या विरोधात एकत्र येतात, तेव्हा मोठे बदल घडतात!’ असे मत मांडले. रामनाथ आंबेरकर यांनी वाचनामुळे मी संपादन, प्रकाशन या क्षेत्रांकडे वळलो, असे सांगितले.
सोपान खुडे, योगेश कोंढाळकर, तेजस्विनी देशमुख, अशोक ढोकले, श्रीहरी तापकीर, दामोदर वहिले, सुनील सस्ते, राजेश बोराटे, माणिक सस्ते, काळूराम सस्ते, गणेश सस्ते, महीपती साठे, संतोष सस्ते, अलंकार हिंगे, सचिन कामठे, विजया आल्हाट, संतोष बारणे, वंदना आल्हाट यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सरला रेवगडे यांनी सूत्रसंचालन केले. अरुण बोऱ्हाडे यांनी आभार मानले.













































