दि.२६(पीसीबी)-मुंबईतील मतदार यादीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि सुनील शिंदे यांच्यासह अनेक नागरिकांची नावे दुबार आढळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारावर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणूक आयोगाने कुणाच्या घरी बसून हे कांड केलं? यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या मतदार याद्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आढळून आली आहेत.
मुंबई पालिकेच्या एकूण २२७ प्रभागांमध्ये ११ लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुबार मतदारांची नावे हटवण्यासाठी मुंबई पालिका प्रशासन लवकरच एक विशेष मोहीम हाती घेणार आहे. पेडणेकर यांच्या प्रभाग क्रमांक १९९ मध्ये सर्वाधिक ८ हजार २०७ दुबार मतदार आहेत. तसेच वरळी विधानसभा मतदारसंघातही ६ हजार ८०० हून अधिक दुबार मतदार नोंदणीकृत आहेत.










































