माॅरिशस येथे जोपासलेली मराठी संस्कृती अभिमानास्पद! – डॉ. रवींद्र घांगुर्डे

0
6


दि.२६(पीसीबी)- ‘महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर राहूनही माॅरिशस येथे जोपासलेली मराठी साहित्य, संगीत आणि संस्कृती अभिमानास्पद आहे!’ असे गौरवोद्गार अभिजात शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी श्री मंगलमूर्ती वाडा, चिंचवडगाव येथे बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी काढले. नवी सांगवी येथील कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने माॅरिशस नॅशनल टीव्हीवरील वरिष्ठ निर्माता व मराठी भावगीत, भक्तीगीत गायक अर्जुन पुतलाजी यांना मराठी संस्कृती संवर्धन पुरस्कार प्रदान करताना डाॅ. घांगुर्डे बोलत होते. गौरवचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदारमहाराज देव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालक मकरंद गोंधळी, कवयित्री कल्पना गवारी,कवी रवींद्र सोनवणे, कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकातून श्रीकांत चौगुले यांनी, “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला असला तरी मूळ महाराष्ट्रीय असलेल्या पण गेली सव्वाशे दीडशे वर्षांपूर्वी माॅरिशस येथे गेलेल्या लोकांच्या पुढील अनेक पिढ्यांनी मराठी संस्कृती जपली आहे. त्यांच्या या मराठीच्या प्रेमासाठी कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना सन्मानित केले.’ अशी पुरस्कारामागची भूमिका मांडली.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अर्जुन पुतलाजी यांनी आधी मराठीतून आणि नंतर माॅरिशस येथे प्रचलित असलेल्या क्रियोल भाषेतून कृतज्ञता व्यक्त केली. मंदारमहाराज देव यांनी अध्यक्षीय मनोगतातून आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर अर्जुन पुतलाजी आणि त्यांच्या समवेत आलेल्या माॅरिशस येथील भजनालंकार मंडळाच्या सुमारे तीस व्यक्तींच्या समूहाने मराठीतून भक्तिगीतांचे सादरीकरण केले. या भक्तिसंगीत मैफलीचा प्रारंभ डाॅ. रवींद्र घांगुर्डे यांनी धरणीधरमहाराज देव रचित
“नाम घ्या रे मोरयाचे
तरी सार्थक जन्माचे…” या पदाने केला; तर अर्जुन पुतलाजी यांनी,
“जय गणराया, श्री गणराया
मंगलमूर्ती मोरया…” ,
“उठा उठा हो गजानन
उघडावे तुम्ही नयन…” आणि
“गणराया गणराया
दर्शन देण्या धावत या…”
अशा सुरेल भक्तिगीतांचे सादरीकरण केले. त्यांना भजनालंकार मंडळाच्या समूहाने गायनसाथ केली. चिंचवड देवस्थानच्या वतीने सर्वांना मंदारमहाराज देव यांच्या वतीने गणेश उपरणे प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

सुभाष चव्हाण, रामगोपाल गोसावी, अक्षय लोणकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. कलारंजन प्रतिष्ठानचे कार्यवाह आर. बी. पाटील यांनी आभार मानले.