दि.२६(पीसीबी)- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त 23 जानेवारी 1999 रोजी आम्ही बाळासाहेब ठाकरे वाढदिवस विशेष अंकाचे प्रकाशन करायचे ठरवले. शिवसेनेच्या एका कार्यक्रमासाठी पुण्यात चित्रपट अभिनेते धर्मेंद्र येणार असल्याचे कळल्याने त्यावेळचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ रायकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून धर्मेंद्र यांनी वेळ दिली. पुण्यातील एका फाइव स्टार हॉटेलमध्ये विशेष अंकाचे प्रकाशन झाले. कोणताही पूर्वपरिचय नसताना धर्मेंद्र यांनी त्यावेळी माझ्याशी केलेल्या गप्पा आजही लक्षात आहेत. दिलखुलास स्वभाव, शिवसेनाप्रमुखांवरील त्यांचे प्रेम, या गोष्टी त्यावेळी मनाला खूप भावल्या अशा आठवणी ज्येष्ठ पत्रकार व शिवसेनेचे माजी पिंपरी चिंचवड शहर संघटक नंदकुमार सातुर्डेकर यांनी जागवल्या.
दमदार अभिनयाच्या बळावर जवळपास 300 चित्रपटांमधून तब्बल 65 वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी निधन झाले.ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले की,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त 23 जानेवारी 1999 रोजी आम्ही बाळासाहेब ठाकरे वाढदिवस विशेष अंक काढला. त्यात शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या मुलाखती होत्या. मी त्या अंकाचे संपादन केले होते. त्याचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करायचे याबाबत संपादक आर एस कुमार यांच्याशी विचार विनिमय सुरू होता. अंकाचे काम पूर्ण झाले आणि नेमक्या 23 जानेवारी 1999 या दिवशी चित्रपट अभिनेते धर्मेंद्र शिवसेनेच्या एका कार्यक्रमासाठी पुण्यात येणार असल्याचे समजले. मी आणि माझ्या सहकारी शर्मिला महाजन आम्ही शिवसेनेचे त्यावेळचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ रायकर यांच्याशी संपर्क साधला.
त्यांच्या माध्यमातून धर्मेंद्र यांची वेळ मिळाली. पुण्यातील एका फाइव स्टार हॉटेलमध्ये शिव सेनाप्रमुख विशेष अंकाचे प्रकाशन झाले. यावेळी स्वतः राजाभाऊ रायकर हेही उपस्थित होते. कोणताही पूर्वपरिचय नसताना चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांनी आमच्याशी खूप दिलखुलास गप्पा केल्या. ड्रीम गर्ल,चरस शोले, एक महल हो सपनो का, यादों की बारात,सीता और गीता, आँखे, मेरा गाव मेरा देश हे धर्मेंद्र यांचे चित्रपट मला खूप भावल्याचे मी त्यांना सांगितले. तेव्हा पाठीवर थाप मारून त्यांनी मला दाद दिली. एवढे मोठे अभिनेते असतानाही थँक्स केले. त्यांची ही आठवण कधीही विसरता न येणारी असल्याचे सातुर्डेकर यांनी सांगितले. पुढे सन 2004 च्या लोकसभा निवडणुकीत चित्रपट अभिनेते धर्मेंद्र हे राजस्थानच्या बिकानेरा मधून भाजपतर्फे निवडणूक जिंकून खासदार झाले तेव्हा खूप आनंद झाला अशा भावना सातुर्डेकर यांनी व्यक्त केल्या.











































