३८,३४० जणांनी एकाच वेळी मतदान करण्याची घेतली शपथ
दि.२४(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने आज सुमारे ३८ हजार ३४० जणांनी मतदान करण्याची विक्रमी शपथ घेतली.
मोशी येथील जगातील सर्वात मोठ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ स्मारकाला मानवंदना देण्यासाठी आज पिंपरी चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, डब्ल्यूटीई फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिव्हर सायक्लोथॉन २०२५’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांमध्ये मतदानाबाबत जागृतीसाठी ‘मतदान शपथ’ देण्याचा विशेष उपक्रम महापालिकेने स्वीप उपक्रमांतर्गत आयोजित केला होता.
यावेळी आमदार महेश लांडगे, विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांच्यासह महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपआयुक्त शिवाजी पवार, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे,उपायुक्त अण्णा बोदडे, डॉ.प्रदीप ठेंगल, माजी नगरसदस्य व माजी नगरसदस्या यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवक यांच्यासह तब्बल ३८ हजार स्पर्धेक, नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते.
मतदानाची विक्रमी शपथ…
“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, ” अशी शपथ यावेळी उपस्थितांनी मान्यवरांच्या उपस्थितीत घेतली.जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.
राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरीता स्वीप उपक्रमांतर्गत स्वीप व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षांतर्गत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे, त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा मतदान जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.येत्या निवडणुकीत शहरातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा.











































