पिंपरी, दि. २२ –
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील या दोघांची राज्य शासनाने बदली केली आहे. मात्र, त्यानंतर देखील या अधिकाऱ्यांनी केलेला कारभार चर्चेचा विषय झाला आहे. या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला असल्याची तक्रार शासनाकडे करण्यात आली होती. नुकतेच राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पिंपरी महापालिकेकडून या दोन्ही अधिकाऱ्यांबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अहवाल मागितला आहे.
महापालिका प्रशासनाकडून हा अहवाल पाठविण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे तत्कालीन आयुक्त सिंह व अतिरिक्त आयुक्त जांभळे या दोघांच्या कारभाराची शासनाकडून चौकशी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपरी महापालिकेतील कारभाराची तक्रार तत्कालीन आयुक्त सिंह व अतिरिक्त आयुक्त जांभळे यांच्या नावासह सनय छत्रपती शासन पक्षाचे अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या तक्रारीची दखल राज्य शासनाने घेतली असून नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी पिंपरी महापालिका आयुक्तांना पत्रद्वारे संबधित तक्रारीच्या अनुषंगाने शासनास अहवाल पाठविण्यास कळविले आहे. प्रा. जाधव यांनी केलेल्या तक्रारीमध्ये आरोप करण्यात आला आहे की, मार्च २०२२ पासून सुरु असलेल्या प्रशासकीय राजवटीचा. आयुक्त सिंह आणि अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी मोठ्या प्रमाणावर गैरफायदा घेतला आहे. ज्याप्रमाणे आपण वसई विरार महापालिकेच्या माजी आयुक्तांच्या घरावर ईडीने छापे टाकून भ्रष्टाचारावर प्रहार केला. त्या प्रकारची कारवाई पिंपरी महापालिकेच्या बाबतीत व्हावी. या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ बडतर्फ करून या पालिकेवर होणारे कर्ज थांबवावे, अशी मागणी तक्रारीतून केली होती.
महापालिकेतून शेखर सिंह व प्रदीप जांभळे या दोघांची बदली झाली आहे. सिंह यांच्यावर नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी शासनाने दिली असून जांभळे त्यांच्या मूळ विभागात रूजू झाले आहेत. मात्र, त्यांच्या बदलीनंतर देखील त्यांचा पालिकेतील कारभार चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्याबद्दल झालेल्या आरोपांबावत महापालिका कसा अहवाल देणार आणि राज्य शासनाकडून या दोन्ही अधिकाऱ्यांवर झालेल्या आरोपांची चौकशी होणार का, हे पाहावे लागणार आहे.
या संपूर्ण प्रकरणात प्रा. जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती असल्याचाही आरोप केला आहे. अनावश्यक कामे काढून एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या महापालिकेला कर्जाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. त्यासाठी या अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी आवश्यक असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केलेले आहे.









































