पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीचे अनुषंगाने प्रारुप मतदार यादीवर प्राप्त होणा-या सूचनांची गांभिर्याने दखल घ्या – आयुक्त श्रावण हर्डीकर

0
1

दि.२२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रारुप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ठ होणा-या संबंधित विधानसभा क्षेत्रांच्या दिनांक १ जुलै २०२५ अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीवरुन महानगरपालिकेची प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी गुरुवारी २० नोव्हेंबर २०२५ रोजी मतदार यादी कक्ष तसेच आठ क्षेत्रीय कार्यालयात आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना स्विकारण्यासाठी २७ नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती सूचना आणि आक्षेपांची गांभिर्याने दखल घ्यावी असे निर्देश ‍ निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, निवडणूक विभागाचे उप आयुक्त सचिन पवार यांच्यासह स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत शिंपी, उप आयुक्त पंकज पाटील, डॉ. प्रदिप ठेंगल, संदिप खोत, सिताराम बहुरे, चेतना केरुरे, सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच प्रारुप मतदार यादी हरकत व सूचना कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रारुप मतदार यादीवर हरकती आणि सूचना तसेच आक्षेप घेण्यासाठी नागरिक येत आहेत. या हरकतींची संबंधीत क्षेत्रीय अधिका-यांनी स्वत: तपासणी करुन पडताळणी करावी. तसेच या हरकतींवर निर्णय घेण्यासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयाकरीता स्वतंत्रपणे एक उप आयुक्त नियुक्त करण्यात आला आहे. त्यांनी मुदतीत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा निपटारा करावा. तसेच हरकत दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिक तसेच पदाधिका-यांचे म्हणणे व्यवस्थितपणे ऐकून घ्यावे. संवेदनशीलतेने सर्व प्रक्रिया हाताळताना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले.

सदर प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादीच्या प्रती महापालिकेच्या मतदार यादी कक्ष विभागात छापील (हार्ड कॉपी) स्वरुपात नागरिकांना पाहण्यासाठी व विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रारुप मतदार यादी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथील मतदार यादी कक्ष व मनपाच्या आठही क्षेत्रीय कार्यालय तसेच मनपाच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदार यादीतील त्यांचे नांव कोणत्या प्रभागात आहे तसेच विधानसभेचा नंबर, भाग यादी क्रमांक व अनुक्रमांक हे शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दिलेली लिंक देखील महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नांव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecvoterlist.in हे नविन संकेत स्थळ विकसित केले असून यावरुन देखील मतदारांचे नांव शोधता येणार आहे.

सदर संकेत स्थळावरुन मतदारांना मतदार यादीतील नांवावरुन व मतदार ओळखपत्रावरील इपिक नंबरचा वापर करुन त्यांचे नांव कोणत्या प्रभागात आहे हे शोधणे अधिक सुलभ, सोपे आहे. यासाठी सर्व मतदारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वरील संकेत स्थळाचा मतदार यादीतील नांव शोधण्याकरीता वापर करावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले आहे. हरकत सूचना दाखल करण्यासाठी निवडणूक मतदार यादी कक्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाच्या मागे,पहिला मजला, मुंबई-पुणे रस्ता पिंपरी या ठिकाणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

तसेच अ क्षेत्रीय कार्यालय (भेळ चौक, निगडी, प्राधिकरण निगडी), ब क्षेत्रीय कार्यालय (पिंपरी लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव), क क्षेत्रीय कार्यालय (नेहरूनगर, पॉलीग्रास ग्राऊंडजवळ, एम.आय.डी.सी. भोसरी), ड क्षेत्रीय कार्यालय (औंध-रावेत रोड, रहाटणी), इ क्षेत्रीय कार्यालय (ग्रोथलॅब इमारत, पांजरपोळ समोर, पुणे-नाशिक रोड, भोसरी), फ क्षेत्रीय कार्यालय (नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत, लोकमान्य टिळक चौक, निगडी), ग क्षेत्रीय कार्यालय (तिसरा मजला, ग क्षेत्रीय कार्यालय, नविन प्रशासकिय इमारत, दिलिप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी मागे, थेरगाव), ह क्षेत्रीय कार्यालय (मुलींचे आय.टी.आय. प्रशिक्षण केंद्र, कासारवाडी) या ठिकाणी कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. प्रारुप मतदार यादीवर मतदारांनी आपल्या हरकती अथवा सूचना २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत उपरोक्त नमूद कार्यालयात राज्य निवडणूक आयोगाने विहित केलेल्या ‘नमुना-अ’ व ‘नमुना-ब’ मध्ये कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात व योग्य त्या पुराव्यासह सादर कराव्यात. पुराव्याशिवाय व विहीत कालावधीनंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही.

दरम्यान प्रारुप मतदार यादीवर प्राप्त होणा-या हरकती व सूचनांची छाननी करुन निर्णय घेण्यासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय उप आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. यामध्ये पंकज पाटील (अ क्षेत्रीय कार्यालय), व्यंकटेश दुर्वास (ब क्षेत्रीय कार्यालय), डॉ. प्रदिप ठेंगल (क क्षेत्रीय कार्यालय), चेतना केरुरे (ड क्षेत्रीय कार्यालय), राजेश आगळे (इ क्षेत्रीय कार्यालय), सिताराम बहुरे (फ क्षेत्रीय कार्यालय), आण्णा बोदडे (ग क्षेत्रीय कार्यालय), संदिप खोत (ह क्षेत्रीय कार्यालय) यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.