दि.२२ (पीसीबी)- गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे) व भारतीय जनता पार्टी या दोन मित्रपक्षांमध्ये संघर्ष चालू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील काही नेते प पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वावर नाराज आहेत. शिवसेनेच्या (शिंदे) आमदारांनी देखील त्यांची नाराजी उघड केली आहे. अशातच शिंदे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मात्र, या भेटीवेळी शाह यांनी शिंदे यांना जुमानलं नाही असा दावा शिवसेनेने (उबाठा) केला आहे. शिवसेनेने (उबाठा) ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून दावा केला आहे की “भारतीय जनता पार्टी त्यांच्या ऑपरेशन लोटस या मोहिमेअंतर्गत शिवसेनेचे (शिंदे) ३५ आमदार फोडणार आहे.”
शिवसेनेने (उबाठा) म्हटलं आहे की “महाराष्ट्रात सध्या जे ‘नाराजी’ महानाट्यट्य चालू आहे, ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीतील त्यांचे पक्षप्रमुख अमित शाह यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली, “हे लोक आमचा पक्ष फोडत आहेत. चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहेत. हे आम्ही सहन करणार नाही.” शिंदे यांच्या या तक्रारीवर अमित शहा फसकन हसले. शिंदे यांनी विचारले, “साहब, आप क्यूं हस रहे हो.” यावर शहा म्हणाले, “कोण कोणाचा पक्ष फोडत आहे? मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे, भाजपाने फोडाफोडी करून बनवला. तुम्ही फुटलात. आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली म्हणून तुम्ही ‘पक्ष’ वगैरे भाषा वापरत आहात. तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपाची उपशाखा आहे.
ठाकरे गटाने म्हटलं आहे की “अमित शाह व शिंदे यांच्यातील भेटीवेळी अमित शाह म्हणाले, शिंदेजी, आप क्रोनॉलॉजी समझ लीजिए. पैसे वाटून माणसे फोडण्यात तुमचा हातखंडा आहे. चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. आप मुंबई जाओ और रवींद्र चव्हाण के साथ बैठकर चाय पिओ. उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका.” शहा-शिंदे यांच्यामधला हा संवाद मनोरंजक आहे. आता शिंदे म्हणतात, “त्यांची दिल्लीवारी यशस्वी झाली व आपला सन्मान राखण्याचा शब्द अमित शाह यांनी दिला.” ही शिंदे यांची बतावणी आहे.”








































