दि.२१(पीसीबी)-मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे येथील साडेतीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या निषेधार्थ मालेगावात आज प्रचंड जनआक्रोश उसळला. “चिमुकलीचा बदला फाशीच” या घोषणाबाजीसह हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. हिंदू-मुस्लीम समाजबांधवांनी एकत्रितपणे मोर्चात सहभाग नोंदवत आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे देखील या मोर्चात सहभागी झाले. “हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी मोर्चातून केली. तर आरोपीची पोलीस कोठडी संपलेली असताना आपले डीवायएसपी बाविस्कर यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली, हे निषेधार्ह असल्याचे म्हणत दादा भुसे यांनी डीवायएसपींच्या निलंबनाची मागणी केली. संतप्त जमावाने न्यायालयाय घुसण्याचा प्रयत्न केला.
बालिकेच्या हत्येच्या निषेधार्थ आज (दि. 21) मालेगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला व्यापारी संघटना, शाळा-महाविद्यालये, विविध सामाजिक व राजकीय संघटना यांचा मोठा पाठिंबा दर्शवला असून मालेगाव कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच रामसेतू पुलावरून निषेध मोर्चा काढत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मालेगावकर जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. यावेळी ‘चिमुकलीचा बदला फाशीच’ अशा घोषणा देत नागरिकांनी घटनेबाबत निषेध व्यक्त केला. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या मोर्चात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मोर्चात भाषण करताना म्हणाले की, मुलीचे काका आणि नागरिकांनी बालिकेवर अत्याचार केलेल्या आरोपीची बाजू न्यायालयात कोणीही वकील मांडणार नाही, असा निर्णय मालेगाव वकील संघाने घेतला आहे. आरोपीची पोलीस कोठडी संपलेली असताना आपले डीवायएसपी बाविस्कर यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली, हे निषेधार्थ आहे. त्याचा मी धिक्कार करतो. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टवर केस घेणार अशी भूमिका घेतली असताना डीवायएसपींनी न्यायालयीन कोठडी मागितली. हो कोणाच्या सांगण्यावरून केले? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दादा भुसे पुढे म्हणाले की, संतापाची लाट उसळली आहे. मी पोलीस अधिकाऱ्यांना मागणी केली त्यांनतर एमसीआरची मागणी बदलून पीसीआरची मागणी पोलिसांनी केली. या डीवायएसपींची बदली करा, अशी मागणी करतो. पण नागरिकांची मागणी आहे त्या डीवायएसपीला निलंबित केले पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्रीकडे करतो, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.








































