ताम्हिणी घाट परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू

0
1


दि. २१(पीसीबी) -रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. पिकनिकहून परतताना त्यांची एसयूव्ही तब्बल 400 फूट खोल दरीत कोसळली, ज्यामुळे सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला. ड्रोनच्या मदतीने वाहनाचा शोध घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे घडला, मात्र वाहन दरीत अडकल्यामुळे आणि परिसरात कुणालाच घटना दिसून न आल्यामुळे गुरुवारी सकाळी पोलिसांना याबद्दल माहिती मिळाली. मृत तरुणांचे वय 18 ते 22 वर्षे दरम्यान असून, ते सोमवारी रात्री पुण्याहून थार एसयूव्हीने ताम्हिणी घाटाकडे निघाले होते.

फोन बंद असल्याने कुटुंबियांना संशय

दरम्यान, मंगळवारी सकाळपासून तरुणांचे फोन सतत बंद लागल्याने कुटुंबातील सदस्यांना काळजी वाटू लागली. संपर्क साधता न आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असता रस्त्यावरच्या एका धोकादायक वळणाजवळ तुटलेली सेफ्टी रेलिंग आढळली. यामुळे दरीत वाहन कोसळल्याचा धोका लक्षात घेऊन शोध अधिक तीव्र करण्यात आला.

ड्रोन कॅमेऱ्यात दिसली दरीत अडकलेली एसयूव्ही

शोधकार्यात ड्रोनचा वापर करण्यात आला. त्यावेळी दरीत खाली झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेली वाहनाची धक्कादायक दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर पोलीस, बचाव पथके आणि स्थानिकांच्या मदतीने तातडीने दरीत उतरण्याची मोहिम राबवण्यात आली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाला एसयूव्हीमध्ये सहा तरुणांचे मृतदेह आढळले. सर्वांना मोठ्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले.तथापी, मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांची ओळख पटवण्यात आली असून, घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणांवर अनेकदा असे अपघात घडत असून, स्थानिकांकडून सुरक्षा उपाययोजनांमध्ये वाढ करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.