बालाजीनगर प्रभागचे ४५०० मतदार गायब, खोडसाळपणाचा कहर

0
44

पिंपरी, दि. २० – पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकिसाठी प्रभाग निहाय मतदार यादीचे प्रारुप आज निवडणूक विभागाने जाहीर केले मात्र, त्यात प्रचंड मोठ मोठे घोळ समोर येत आहेत. भोसरी परिसरातील बालाजीनगर प्रभाग क्रमांक ८ मधील सुमारे ४ हजार ५०० मतदारांची नावे यादीतून गायब असल्याचे उघडकिस आले. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमाताई सावळे यांच्या निकटवर्ती मतदारांचीच नावे यादितून वगळण्यात आली आहेत, असे तपासणीत स्पष्टपणे निदर्शनास आले.


महापालिकेच्या ३२ प्रभागांच्या मतदार याद्यांचे प्रारुप आज दुपारी जाहीर कऱण्यात आले. प्रभाग रचनेनुसार याद्या फोडण्यात आल्या. बालाजीनगर प्रभाग क्रमांक ८ मधील यादी क्रमांक ३८८, ३८९, आणि ३९० मधील सुमारे ४५०० मतदारांची नावेच गायब आहेत. प्रभाग निहाय याद्या फोडतानाच कोणीतरी हा खोडसाळपणा केल्याचा दाट संशय सिमाताई सावळे यांनी व्यक्त केला. मतदार वगळल्याचे सखोल तपासणीत आढळले, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकऱणी आपण निवडणूक विभागाकडे तक्रार कऱणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.


अशाच प्रकारे बहुसंख्य प्रभागांच्या मतदारयादीत घोळ आहेत. राजकीय सुडापोटी काही नावे, चाळी, सोसायट्या वगळून दुसऱ्याच यादीत समाविष्ठ केल्याच्या तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी मतदारांची नावे वगळून भलत्याच प्रभागाच्या यादीत घुसडल्याचेही सांगण्यात आले.
निवडणूक विभागाने सर्व प्रभागांच्या यादीत मतदारसंख्या जवळपास सारखी असेल आणि कमी अधिक फरक हा १० टक्केच्या पुढे नसावा असे सांगितले होते. प्रत्यक्षात सर्वात मोठा प्रभाग क्रमांक १ चिखली गावठाण हा ७४ हजार ३४० मतदारांचा आहे, तर थेरगावगावठाण प्रभाग २३ मध्ये फक्त ३४ हजार ७६५ मतदार आहेत. दुपटीपेक्षा मोठा अधिक मतदारसंख्येचे प्रमाण कमी जास्त असल्याने असमतो वाढला आहे. तब्बल सहा प्रभाग हे ६४ हजारापेक्षा जास्त मतदारांचे तर पाच प्रभाग हे ४० हजाराच्या आतील मतदारांचे आहेत.