पिंपरी चिंचवड महानगरपालिका नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

0
50

२७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार

पिंपरी,दि.२० – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी २० नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२५ हा कालावधी देण्यात आला आहे. नागरिकांकडून येणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले सभागृह येथे मुख्यालय स्तरावर कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १ ते ३२ करीता तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांबाबत काही हरकती व सूचना दाखल करावयाच्या असतील, तर अशा मतदारांनी नमुना ‘अ’ मध्ये आणि तक्रारदारांनी नमुना ‘ब’ मध्ये दिलेल्या मुदतीमध्ये त्या दाखल कराव्यात. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती/सूचनांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती महापालिका निवडणूक विभागातून देण्यात आली.

सदर प्रारूप मतदार याद्या प्रभागनिहाय माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रति पृष्ठ रु. २/- याप्रमाणे सावित्रीबाई फुले सभागृह येथे विक्रीस उपलब्ध आहेत, अशी माहिती देखील निवडणूक विभागातून देण्यात आली.
…..


राज्य निवडणूक आयोगाचा मतदार यादी कार्यक्रम

प्रारूप मतदार यादी हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिद्ध करणे : २० नोव्हेंबर २०२५

प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करणे : २० नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२५

प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे : ५ डिसेंबर २०२५

मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे : ८ डिसेंबर २०२५

मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे : १२ डिसेंबर २०२५
……

प्रारूप मतदार यादी ही आगामी निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. शहरातील प्रत्येक मतदाराने स्वतःचे नाव योग्यरित्या नोंदले आहे का, याची खात्री करून आवश्यक असल्यास हरकती व सूचना वेळेत दाखल करणे अत्यावश्यक आहे. प्रारूप मतदार यादीवर येणाऱ्या हरकती व सूचनांवर निवडणूक आयोगाच्या नियमान्वये कार्यवाही करण्यात येईल.
-विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका