दि.१८ (पीसीबी) -नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरणे आकाराला येत असल्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड अंतर्गत खदखद असल्याची माहिती समोर आली आहे. याच अंतर्गत नाराजीमुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अघोषित बहिष्कार टाकल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, आज राज्य मंत्रिमंडळाची नियोजित बैठक होती.
मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी प्रत्येक पक्षाची प्री-कॅबिनेट बैठक होते. शिंदे गटाच्या प्री-कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे सगळे मंत्री उपस्थित होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला यापैकी एकही मंत्री गेला नाही. केवळ एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेच्या उर्वरित मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला. कॅबिनेटची बैठक आटोपल्यानंतर शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पोहोचले. या दालनात सध्या देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा सुरु आहे, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
शिंदे गटाच्या या नाराजीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या नाराजीमागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यानिमित्ताने सुरु असलेली फोडाफोडी कारणीभूत असल्याचे समजते. आज सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जातीने उपस्थित होते. भाजपने कालपासून ही बातमी गुप्त ठेवत श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या नगरसेवकांना गळाला लावले होते. याशिवाय, राज्याच्या इतर भागांमध्येही शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपकडून गळाला लावले जात आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री प्रचंड नाराज आहेत. त्यामुळेच या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे समजते. सध्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक सुरु आहे. ठाणे, पालघर, कल्याण भागातील शिंदे गटाचे पदाधिकारी प्रचंड नाराज आहेत. गेल्य काही दिवसांपासून गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात जनता दरबार घेण्याचा सपाटा लावला आहे. तर रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना गळाला लावून मानाने भाजपमध्ये प्रवेश दिला होता. या सगळ्या घडामोडींवर शिंदे गट प्रचंड नाराज असल्याचे समजते.
शिवसेना शिंदे गटाचे कोणते मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अनुपस्थित?
उदय सामंत
प्रताप सरनाईक
दादा भुसे
संजय शिरसाट
प्रकाश आबिटकर
भरत गोगावले
शंभूराज देसाई
गुलाबराव












































