पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील आर.एम.सी. प्लांट यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत परवानगी दिली जाते. सदर आर.एम.सी. प्लांटमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र काही आर.एम.सी. प्लांट धारकांकडून सदर उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसून त्यामुळे वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त होत होत्या.
त्यानुसार प्रदूषण मंडळाने महापालिका पर्यावरण विभागास पत्र पाठवून महापालिका परिसरातील एकूण ३० प्लांटची यादी सील करण्यासाठी दिली आहे. त्या अनुषंगाने ज्या आर.एम.सी. प्लांटच्या ठिकाणी वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असे प्लांट बंद करण्याची कारवाई महापालिकेकडून केली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता मानकांच्या मर्यादेत राहावी, तसेच नागरिकांना वायू प्रदूषणाचा त्रास होऊ नये, याकरिता पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दक्षता घेण्यात येत आहे. त्याकरिता महापालिकेने ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनची (ग्रॅप) अंमलबजावणी केलेली आहे. तसेच शहरातील पर्यावरणविषयक समस्या व तक्रारींचे तात्काळ निरसन करण्यासाठी दोन उपद्रव शोध पथकांची नेमणूक केलेली आहे. त्यानुसार शहरातील वायू प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यात येत आहे. याच अनुषंगाने आता प्रदूषण मंडळाचे पत्र प्राप्त होताच ज्या आर.एम.सी. प्लांटच्या ठिकाणी वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली किंवा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
….
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्रान्वये आर.एम.सी. प्लांट कार्यान्वित करण्याबाबत महत्त्वाचे नियम:
१. आर.एम.सी. प्लांटच्या परिसरात धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी ‘वॉटर स्प्रिंकलिंग सिस्टम’ वापरणे अनिवार्य आहे.
२. मिक्सिंग ऑपरेशन्स बंदिस्त जागेतच करणे बंधनकारक आहे.
३. खडी, वाळू, क्रश सॅंड यांच्या वाहतुकीदरम्यान वायू प्रदूषण होऊ नये, याकरिता वाहनांना ताडपत्रीने झाकण्यात यावे.
४. कार्यान्वित असलेले आर.एम.सी. प्लांट मर्यादित वायू प्रदूषणाच्या पातळीत असल्याचे व निर्धारित कालावधीतच कार्यान्वित ठेवणे बंधनकारक आहे.
५. आर.एम.सी. प्लांटच्या परिसरातील ध्वनीची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त नसावी.
……
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे आरोग्य व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक घटकाने नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणाच्या अनुषंगाने असणाऱ्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेची पथके कार्यरत आहेत. नुकतेच आर.एम.सी. प्लांटबाबत प्रदूषण मंडळाचे पत्र प्राप्त झाले असून ज्या प्लांटच्या ठिकाणी वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली किंवा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, त्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेत आहोत.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी व नागरिकांना प्रदूषणमुक्त वातावरण देण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. आर.एम.सी. प्लांट्सनी पर्यावरणीय नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही शिथिलता दाखवली जाणार नाही. नागरिकांचे आरोग्य व पर्यावरणाचे संरक्षण ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका













































