पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर तब्बल सात वर्षानंतर पोलीस आयुक्तालयाला स्वतंत्र घटक झेंडा उपलब्ध झाला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या पाठपुराव्यामुळे १० नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने या घटक झेंड्याला मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील विविध जिल्हे व आयुक्तालयाच्या पोलीस दलांना घटक झेंडे पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मान्यता देवून प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. हे घटक झेंडे हे महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावा व इतर राज्यस्तरीय पोलीस स्पर्धामध्ये सहभागी होताना उपयोगात आणले जातात. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना १५ ऑगस्ट २०१८ रोजी झालेली आहे. मात्र, अद्यापपर्यंत आयुक्तालयाला घटक झेंडा उपलब्ध झाला नव्हता. ही बाब लक्षात घेवून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे घटक झेंड्याचे रेखाचित्र तयार करुन त्याच्या मंजुरीसाठी राज्याचे पोलीस महासंचालक यांना अहवाल सादर केला होता. त्यास १० नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने मान्यता दिली आहे.













































