शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षनाव व निवडणूक चिन्हावर सुनावणी आता २१ जानेवारीला

0
4

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनाव व निवडणूक चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात २१ जानेवारीला अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या याचिकांवरील सुनावणी सकाळी साडेअकरा वाजता निश्चित केली असून त्या दिवशी अन्य कोणतेही कामकाज आपल्यापुढे न ठेवण्याची सूचना खंडपीठाने न्यायालय निबंधकांना केली. ही सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचा बुधवारी हिरमोड झाला.

शिवसेना व राष्ट्रवादीच्या याचिकांवर २१ जानेवारीला दिवसभर सुनावणी घेऊन गरज भासल्यास दुसऱ्या दिवशीही सुनावणी घेतली जाईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केल्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे निर्माण झालेल्या पक्षनाव व निवडणूक चिन्हाच्या वादावर जानेवारी अखेरीपर्यंत निर्णय येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. परिणामी २१ जानेवारीपूर्वी मुंबई, ठाण्यासह सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तविला जाते. यामुळेच सर्वोच्च न्यायालयात चिन्हाचा वाद सुनावणीस येईल तोपर्यंत शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी महत्त्वाच्या असलेल्या निवडणुका पूर्ण झाल्या असण्याची शक्यता अधिक आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने निवडणूक चिन्हाच्या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाचे वतीने वकील देवदत्त कामत यांनी केली. जानेवारी अखेरपर्यंत महापालिकेच्या निवडणुकाही पार पडतील. त्यातही मुंबई-ठाणे या महापालिका निवडणुका ठाकरे गटाप्रमाणे शिंदे गटासाठीही महत्त्वाच्या आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने धनुष्य-बाण या निवडणूक चिन्हाचा वापर केला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचा वापर केला जाऊ नये, यासाठी ठाकरे गट आग्रही होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक चिन्ह नोव्हेंबर अखेरीस निश्चित होणार आहे. त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा अंतिम निकाल लागणे ठाकरे गटाला अपेक्षित होते. मात्र, आता ही सुनावणी जानेवारीमध्ये होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाला धनुष्य-बाणाचा वापर करता येऊ शकेल.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनीही शिंदे यांचा पक्षच मूळ शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमदार सुनील प्रभू यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला घड्याळ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. अजित पवार गटात गेलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. शिवसेनेच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणीसाठी आल्या, तेव्हा ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी या याचिकांवर लवकरात लवकर निर्णय देण्याची विनंती केली.

युक्तिवादासाठी तीन तास
न्या. सूर्य कांत यांनी शिवसेना-ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट यांच्या वकिलांना युक्तिवादासाठी तीन तासांचा कालावधी दिला असून शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाच्या वकिलांना दोन तासांचा वेळ देण्यात आला आहे. २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता अंतिम सुनावणी सुरू होईल व पाच तासांमध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपेल. गरज असेल तर २२ जानेवारी रोजीही ही सुनावणी सुरू राहील, असे निर्देश न्या. सूर्य कांत यांनी दिले.

सुनावणीची बतावणी सुरू : ठाकरे
सुनावणीची बतावणी सुरू आहे. प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल, यावर आमचा आजही ठाम विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची अंतिम सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आल्यावर व्यक्त केली.