‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमांतर्गत पाच शहरांच्या प्रतिनिधींची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेट

0
2

दि.१२(पीसीबी)-भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमांतर्गत केंद्र सरकारने पिंपरी चिंचवड महापालिकेची निवड मार्गदर्शक शहर म्हणून केली आहे. या उपक्रमांतर्गत सुरगाणा (जि. नाशिक), लखांदूर (जि. भंडारा), मंचर (जि. पुणे), जामखेड (जि. अहिल्यानगर) आणि आळंदी (जि. पुणे) या पाच नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रतिनिधींसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रांचा अभ्यास दौरा पिंपरी चिंचवड महापालिकेने आयोजित केला होता.

या उपक्रमाचा उद्देश स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांचा अनुभव इतर शहरांपर्यंत पोहोचवणे आणि शाश्वत घनकचरा व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन करणे हा होता. या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, आरोग्य कार्यकारी अधिकारी तथा सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, हॉटेल वेस्ट टू बायोगॅस युनिट, बांधकाम राडारोडा प्रकल्प, बायोमायनिंग प्रकल्प, दापोडी शून्य कचरा प्रकल्प, आर.आर.आर. केंद्र आणि सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट यांची पाहणी केली. कचरा विलगीकरण, संकलन, प्रक्रिया, पुनर्वापर आणि नागरिकांचा सहभाग या सर्व टप्प्यांबद्दल सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली.

या दौऱ्यादरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल, उपअभियंता योगेश आल्हाट, पंकज द्विवेदी, कनिष्ठ अभियंता स्वालीहा मुल्ला, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक संदीप राठोड, आकाश पुरी, अक्षय पाटील, रिनी रिजोनिया आणि भरत साळुंखे आदींनी उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेने राबवलेली प्रणाली अत्यंत प्रभावी आहे. या अनुभवातून आमच्या शहरात स्वच्छतेसाठी नवी दिशा मिळेल, अशी आशा या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट कचरा ट्रॅकिंग प्रणाली, डिजिटल मॉनिटरिंग साधने आणि नागरिकांच्या तक्रारींवर तत्पर प्रतिसाद देणारी यंत्रणा याविषयी सादरीकरण केले. वेस्ट टू एनर्जी व बायोगॅस प्रकल्पांमुळे निर्माण होणारी स्वच्छ ऊर्जा आणि कार्बन उत्सर्जनात होणारी घट याबाबत सविस्तर माहिती दिली.


पिंपरी चिंचवड महापालिका ही नेहमीच स्वच्छतेत आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांमध्ये अग्रणी राहिली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लहान शहरांनाही प्रगत स्वच्छता पद्धतींची प्रेरणा मिळावी, हेच आमचे उद्दिष्ट आहे.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका


घनकचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि पारदर्शक प्रक्रिया या आमच्या कार्यपद्धतीच्या केंद्रस्थानी आहेत. स्वच्छतेच्या प्रत्येक टप्प्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत विकासाचे आदर्श उदाहरण ठरावे, यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.
– डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका