रुपाली ठोंबरे यांना ठाकरे गटाची खुली ऑफर

0
12

मुंबई, दि. १० : राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करताच रुपाली ठोंबरे यांना पहिली ऑफर आली आहे. रुपाली ठोंबरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू अशी ऑफर सुषमा अंधारे यांनी दिली. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे रुपाली ठोंबरे यांची हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांना वगळण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे असा वाद सुरू आहे. त्याचाच फटका रुपाली ठोंबरे यांना बसला असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करताच ठाकरे गटाकडून रुपाली ठोंबरे यांना ऑफर आली आहे. रुपाली ठोंबरे या माझ्या चांगल्या मैत्रिण आहेत. त्यांनी शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त करावी, आम्ही त्याचं स्वागत करू असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, “रूपाली ठोंबरे ही माझी चांगली मैत्रीण आहे आणि ती राहील. तिला कोणतेही भीती नाही, ईडी किंवा सीबीआयचा तिला बॅकेज नाही. सर्वार्थाने ती अतिशय क्लीन इमेज असलेली व्यक्ती आहे. अशी महिला कुठच्याही पक्षात येणं कोणालाही आवडेलच. पण माझ्या पक्षात ती यावी म्हणून तिच्या त्या पक्षात नुकसान व्हावं असा विचार करणारी मी नाही. जर तिच्या पक्षात तिला स्कोप मिळत असेल तर तिनं तिथे काम करावे.”