पिंपरी (दिनांक : १० नोव्हेंबर २०२५) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशप्रेमाने भारावून कार्यरत असलेल्या सर्व सेवाभावी संस्थांची मातृसंस्था आहे!’ असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद केंद्रीय सह मंत्री तथा अखिल भारतीय सह सत्संग प्रमुख महेंद्र तथा दादा वेदक यांनी पांजरपोळ, भोसरी येथे रविवार, दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी केले. पुणे ग्रामीण विभागातील विश्व हिंदू परिषदेच्या चार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी वर्गातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दादा वेदक बोलत होते. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे, प्रांत सहमंत्री नितीन वाटकर, विभाग मंत्री सोमनाथ दाभाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
दादा वेदक पुढे म्हणाले की, ‘डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी समर्पित भावनेने शंभर वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. देशभरात राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन असंख्य कार्यकर्ते देशाच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांमधून आपले आयुष्य वेचित आहेत. मानमरातब, नावलौकिक, प्रसिद्धी, संपत्ती, सत्ता अशा कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांपासून हे कार्यकर्ते अलिप्त राहून देशसेवा करीत आहेत. जरी संस्था वेगवेगळ्या नावाने अस्तित्वात असल्यातरी यामधील कार्यकर्ते एकविचाराने परस्परपूरक भावनेतून नि:स्पृह, नि:स्वार्थपणे काम करीत आहेत अन् हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची खरी शक्ती आहे!’ यावेळी वेदक यांनी आपल्या वक्तव्यातून डॉ. हेडगेवार यांचा प्रेरणादायी जीवनपट कार्यकर्त्यांपुढे साकार केला. यावेळी किशोर चव्हाण, नितीन वाटकर, संतोष खामकर,नितीन महाजन, ॲड. मृणालिनी पडवळ, संजय गोडबोले, दयानंद शिंदे, अप्पा कुलकर्णी यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. सोमनाथ दाभाडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या संयोजनात विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री धनंजय गावडे, अध्यक्ष ॲड. ललित झुनझुनवाला, नाना सावंत, संभाजी बालघरे, किरण शिंदे, अरविंद लंघे यांनी सहकार्य केले















































