दि.०७(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने राबविलेल्या विविध जनजागृती उपक्रमांमुळे आणि सुलभ ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिक आता मोठ्या प्रमाणात ऑनलाईन माध्यमातून मालमत्ता कर भरण्याकडे वळले आहेत. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत शहरातील ७ लाख ४० हजार मालमत्ताधारकांपैकी ४ लाख ७७ हजार २८४ मालमत्ताधारकांनी कर भरला असून, त्यापैकी ३ लाख ९३ हजार ७७१ मालमत्ताधारकांनी ऑनलाईन माध्यमातून कर भरला आहे.
गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. ‘ऑनलाईन कर भरा’ या मोहिमेखाली नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. यामध्ये विशेष सवलतींची घोषणा, एसएमएस, सोशल मीडिया, स्थानिक चौकांवर सार्वजनिक घोषणांद्वारे जनजागृती करण्यात आली. या उपक्रमांचा परिणाम म्हणून नागरिकांनी प्रत्यक्ष कर कार्यालयात जाण्यापेक्षा ऑनलाईन माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर केला.
महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या मालमत्तेची माहिती, थकबाकी रक्कम, पावती डाउनलोड तसेच सवलतींचा तपशील एकाच ठिकाणी पाहता येतो. सुरक्षित पेमेंट आणि सुलभ वापरामुळे नागरिकांचा या डिजिटल माध्यमावर विश्वास वाढला आहे.
६३१ कोटी ६६ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल
पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ या कालावधीत १ एप्रिल २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५ या काळात ६३१ कोटी ६६ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. यामध्ये ऑनलाईन माध्यमातून जमा झालेल्या कराची रक्कम तब्बल ५१५ कोटी रुपये आहे.
असा झाला भरणा
ऑनलाईन – ५१५ कोटी
रोख – ४३ कोटी २० लाख
धनादेश – ३८ कोटी ६६ लाख
डिमांड ड्राफ्ट – १ कोटी ८९ लाख
ईडीसी – ६ लाख
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक डिजिटल साधनांचा उत्तम वापर करत आहेत. ऑनलाईन पेमेंट प्रणालीमुळे पारदर्शकता वाढली आहे आणि कर संकलन प्रक्रियेत वेग आला आहे. येत्या काळात अधिक सुविधा समाविष्ट करून ही प्रणाली अजून सुलभ करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे उपायुक्त पंकज पाटील यांनी सांगितले.












































