मुंबई, दि. ४ – अखेर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाची दुपारी चार वाजता पत्रकार परिषद होणार असून आजपासून आचारसहिंता लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही घोषणा होते का, याकडे आता लक्ष लागले आहे. आयुक्त दिनेश वाघमारे या पत्रकार परिषद घेणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण तीन टप्प्यात सर्व निवडणुका पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. ३ टप्प्यांसाठी ८५ दिवस मिळणार आहेत. यात नगरपालिका निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी २१ ते २५ दिवसांचा असणार आहे. तर ३२ जिल्हा परिषदा व ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ३० ते ३५ दिवसांचा आणि २९ महापालिकांचा २५ ते ३० दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 31 जानेवारीपर्यंत निवडणुका पूर्ण होणे बंधनकारक आहे. म्हणजे तीन टप्प्यांसाठी ८५ दिवस मिळणार आहेत. राज्यातील नऊ कोटींहून अधिक मतदार या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजाववणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या आणि २९ महापालिकांची निवडणूक होणार आहे. यात नगरपालिकांच्या प्रभागांचे, नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले आहे. शिवाय मतदार यादीही अंतिम झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात २८९ नगरपालिका, नगरपंचायतींच्याच निवडणुका घेण्याचे निश्चित झाले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर झाले असले तरीही मतदार यादी अद्याप अंतिम झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या प्रभाग व महापौरांचे आरक्षण नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे. शिवाय ६ नोव्हेंबरला मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम तिसऱ्या टप्प्यात असणार हे निश्चित आहे.















































