पिंपरी, दि. ३ : पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी (वय ३५) याला ४६ लाखांची लाच घेताना पकडले आहे. पुणे शहरातील रस्ता पेठ भागात पोलिसांनी रविवारी (२ नोव्हेंबर) अटक केली आहे. दोन कोटी रुपयांची लाच मागत नंतर ५० लाख रुपयांवर तोडपाणी केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ४८ वर्ष) वकील आहेत. एका गुन्ह्यामध्ये वकिलाच्या अशीलावर असणाऱ्या गुन्हा मदतीसाठी व त्याच्या अटकेत असलेल्या वडिलांच्या जामीन अर्जाबाबत सहाय्य करण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांनी लाच मागितली होती. त्यानंतर वकिलांनी लाच- लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. आरोपीच्या मागणीत अचानक वाढ करता आली आणि दोन लाख रुपयांऐवजी दोन कोटी रुपयांची लाच मागितली गेली होती. त्यापैकी ५० लाख रुपयांचा पहिला हप्ता लवकरात लवकर घेण्याचा त्यांचा दबाव होता.
२ नोव्हेंबर रोजी रस्ता पेठ भागातील उंटाड्या मारुती मंदिराच्या समोर तसेच संबंधित भागात पोलीसांनी सापळा रचून आरोप्याला रंगेहात पकडले. ५० लाखांपैकी ४६ लाख ५० हजारांची नोटा स्वीकारताना अटक करण्यात आला. आरोपीची झडतीत ४६,५०,००० रुपयांमध्ये १,५०,००० खऱ्या तसेच ४५ लाख रुपये खेळण्यांच्या नोटा मिळाल्या आहेत. तसेच आरोपीकडून दोन मोबाईल फोन (सॅमसंग फोल्ड व अँपल आयफोन), रोख रक्कम ३,६०० रुपये आणि शासकीय ओळखपत्रही जप्त केले गेले. आरोपीच्या घरी झडतीसाठी पोलीसांचा पथक तात्काळ रवाना करण्यात आला असून झडतीची प्रक्रिया सुरु आहे. समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरोपीसंबंधी अधिक तपास सुरू असून याबाबत पुढील माहिती लवकरच सार्वजनिक करण्यात येईल.
प्रमोद चिंतामणी हे पोलिस उप निरीक्षक नेमणूक आर्थिक गुन्हे शाखेत नोकरीस आहेत. तर दिघी रोड, भोसरी येथील गंगोत्री पार्क मधील सोपान रेसिडेन्सी मधील फ्लॅट नंबर ५०४ मध्ये वास्तव्यास आहेत. ते मुळचे अहिल्यानगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील आहेत
कष्टकरी जनता आघाडीचा तीव्र संताप
या धक्कादायक घटनेनंतर कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “भ्रष्टाचारामुळे समाजाचे आणि व्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे. जर पोलीस दलच भ्रष्टाचारात लिप्त असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे?” असा संतप्त सवाल डॉ. बाबा कांबळे यांनी उपस्थित केला.
डॉ. बाबा कांबळे पुढे म्हणाले, “नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार पुणे विभाग भ्रष्टाचारात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे आणि आता या कृत्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची बदनामी झाली आहे. खाकीचा सन्मान राखायचा असेल, तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी डॉ. बाबा कांबळे यांची मागणी आहे.”














































