‘रामदूत हनुमान म्हणजे आदर्श कार्यकर्ता होय’-सहमंत्री ॲड. सतिश गोरडे

0
8

दि.०३(पीसीबी) -‘रामदूत हनुमान म्हणजे आदर्श कार्यकर्ता होय!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ आणि विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी वनवासी विद्यार्थी वसतिगृह, राजगुरूनगर येथे रविवार, दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी केले. बजरंग दल भीमाशंकर जिल्हा आयोजित दोन दिवसीय अभ्यासवर्गात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ॲड. सतिश गोरडे बोलत होते. याप्रसंगी प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री नितीन वाटकर, प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे, भास्कर भगत, विभाग संयोजक आविष्कार सावंत, संजय गोडबोले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, ‘ज्याप्रमाणे प्रचंड ताकद असूनही महाबली हनुमान यांनी प्रभू रामचंद्र यांच्या पायाशी निष्ठा अर्पण करून त्यांच्या पाठीशी आपले संपूर्ण बळ उभे केले; त्याप्रमाणेच अठरापगड जातीतील मावळ्यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पाठीशी आपले सर्वस्व अर्पण करून हिंदवी स्वराज्यासाठी आपले बळ उभे केले म्हणूनच समर्थ रामदासस्वामी यांनी ‘शिवरायांचे आठवावे रूप! शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी!’ असे वर्णन केले आहे. हिंदुराष्ट्र आणि हिंदुधर्म यांच्या प्रचाराचे काम करताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बजरंगबली हनुमान आणि वीर मावळे यांचा आदर्श घ्यावा!’ असे आवाहन त्यांनी केले. दोन दिवसीय अभ्यासवर्गात नितीन वाटकर यांनी ‘देशाची वर्तमान स्थिती आणि हिंदू समाजापुढील आव्हाने’ , संदेश भेगडे यांनी ‘बजरंग दलाचे महत्त्व’ , भास्कर भगत यांनी ‘बलोपासना केंद्राचे महत्त्व’ या विषयांवर मार्गदर्शन केले. अभ्यासवर्गाच्या समारोपप्रसंगी किशोर चव्हाण यांनी ‘नशामुक्त युवा अर्थात सशक्त भारत’ या विषयावर मार्गदर्शन केले.जिल्हा मंत्री गणेश रौंधळ, जिल्हा संयोजक अवधूत चौधरी, मनोज देशमुख, सुमित शिनगारे, प्रशांत खैरे, अजिंक्य तारू, अमोल ढमरे यांनी संयोजन केले.