मद्यपी वाहनचालकाला १० हजार दंडासह एक अनोखी शिक्षा

0
14
xr:d:DAFYwBWuZk4:2240,j:4277104706,t:23050902

पुणे, दि. २९ : मद्यपान करून गाडी चालविणाऱ्या तरुणाला पुण्याच्या मोटार वाहन न्यायालयाने १० हजार दंड आणि एक हजार हॅण्डबिल्स छापून वाहतूक सिग्नलवर चालकांना वाटून कायद्याची माहिती देण्याची शिक्षा सुनावली आहे. त्याबाबतचा निकाल पुणे मोटार वाहन न्यायालयाने २७ ऑक्टोबर रोजी दिला आहे. २८ वर्षीय तरुण आज १० हजारांचा दंड भरणार असल्याची माहिती पिंपरी- चिंचवड वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई २२ जुलै २०२५ रोजी हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत करण्यात आली होती. संबंधित तरुण मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले होते. त्याच्याविरुद्ध मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान न्यायालयाने २७ ऑक्टोबर रोजी निकाल देताना १० हजार रुपयांचा दंड आणि एक हजार हॅण्डबिल्स वाटण्याची शिक्षा दिली. या तरुणाने आज (२९ ऑक्टोबर) दंडाची रक्कम भरल्याची माहिती पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

न्यायदंडाधिकारी, मोटार वाहन न्यायालय, पुणे यांनी दिलेल्या शिक्षेचा हेतू केवळ दंड वसूल करणे नसून समाजात जागरूकता निर्माण करणे हा आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम २३ अन्वये दिलेल्या या शिक्षेचा उद्देश नागरिकांना कायद्याबद्दल माहिती देणे आणि भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालणे हा आहे.

वाहतूक पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले की, “मद्यपान करून वाहन चालवणे हा केवळ वाहतूक नियमांचा भंग नाही, तर जीवघेणा गुन्हा आहे. न्यायालयाने दिलेली ही शिक्षा निश्चितच जनजागृतीसाठी आदर्श ठरेल. एक हजार हॅण्डबिल्स छापून चालकांना देताना तो तरुण स्वतःही जनजागृतीचा भाग बनेल.”

पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत तब्बल २ हजार ९८४ वाहनचालकांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई केली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.