१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
चिंचवड येथील नकुल भोईर यांच्या खुनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी चैताली भोईर हिचा प्रियकर सिद्धार्थ दिपक पवार (२१, बालाजी अपार्टमेंट, लिंकरोड, चिंचवड) याचा या खुनात सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्या दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नकुल आनंद भोईर (४०, माणिक कॉलनी, चिंचवड) यांचा खून त्यांची पत्नी चैत्राली हिने आपण एकटीने केल्याची माहिती तिनेच पोलिसांना फोन करून दिली. त्यानुसार पोलिसांनी तिला अटक केली. मात्र या प्रकरणात आणखी कोणीतरी सहभागी असावे, अशी शंका पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र त्या दोघांनीही पोलिसांना काहीच माहिती दिली नाही. अखेर पोलिसांनी विविध फंडे वापरून आरोपींकडून गुन्ह्याबाबत माहिती काढली.
आरोपी सिद्धार्थ पवार हिचे आरोपी महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाच्या कारणावरून नकुल भोईर आणि पत्नी चैत्राली भोईर यांच्यात वादविवाह होत होते. आपल्या अनैतिक संबंधाच्या आड नकुल भोईर येत असल्याने त्या दोघांनीही नकुलचा काटा काढण्याचे ठरविले. त्यातच चैत्राली हिने अनेकांकडून कर्ज घेतल्याची माहितीही नकुल यांना समजली. त्या कारणावरून चैत्राली व नकुल यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी नकुलने पत्नीला मारहाण केली. आपल्या प्रेयसीला मारहाण झाल्याने सिद्धार्थ याचा राग अनावर झाला आणि दोघांनी संगनमताने ओढणीच्या साह्याने नकुलचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले.












































