डॉ. विश्वास मोरे यांच्या ‘पाऊले तुकोबांची’ या ग्रंथास मातृ मंदिर विश्वस्त संस्थेचा प्रथम क्रमांक

0
8

दि.२९(पीसीबी)- मातृ मंदिर विश्वस्त संस्था निगडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय संत साहित्य पुरस्कार जाहीर झाले असून जगद्गुरु प्रकाशनाच्या डॉ. कल्पना काशीद आणि लेखक डॉ. विश्वास मोरे यांच्या ‘पाऊले तुकोबांची’ या ग्रंथास प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. त्याचबरोबर संत जीवन आणि ललित साहित्य गटात डॉ. के. वा. आपटे यांच्या ‘षष्ठ पंचशीका’ या ग्रंथास प्रथम क्रमांक मिळाला आहे अशी माहिती संस्थेचे कार्यवाह मनोज देवळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पुण्यातील मातृ मंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीने गेल्या २७ वर्षांपासून संत साहित्य विषयक लेखन, ग्रंथासाठी पुरस्कार दिले जात आहे. लेखक आणि प्रकाशक यांना विभागून पुरस्कार देण्यात येतो. समीक्षक राधा गोडबोले आणि डॉ. रजनीताई पत्की यांनी परीक्षण केले. दोन गटाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये चिंतनपर आणि विवेचनपर पुस्तकांच्या गटामध्ये जेष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मोरे यांच्या ‘पाऊले तुकोबांची’ ग्रंथास प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याचबरोबर रोहन उपळेकर यांच्या ‘विदारूनी महास्तंभ देव प्रकट स्वयंम’ या ग्रंथास द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक डॉ. के. वा आपटे यांच्या ‘आद्य शंकराचार्य कृत सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रह’ या आणि डॉ. नारायण रघुनाथ देशपांडे यांच्या पूर्णकळा’ ग्रंथास तृतीय क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे. विशेष पुरस्कार डॉ. श्यामा घोणसे यांच्या ‘क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर’ या ग्रंथ तसेच विश्वनाथ छत्रे यांच्या ‘श्री गणेशोत्सव गीतसार’ या ग्रंथास विभागून बक्षीस देण्यात आले आहे.

ललित साहित्य पुरस्कार संत जीवन आणि ललित साहित्य या गटामध्ये डॉ. के. वा. आपटे यांच्या ‘षष्ठ पंचशीका’ या ग्रंथास प्रथम क्रमांक आणि डॉ सुनिती सहस्रबुद्धे यांच्या ‘सार्थ श्रीराम गीता’ या ग्रंथास द्वितीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण समारंभ बुधवारी, दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता, निगडी येथील ज्ञानप्रबोधनी नवनगर विद्यालय, मनोहर वाढोकार सभागृहामध्ये होणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह मनोज देवळेकर यांनी दिली आहे.