मयत दिरांशच्या आईचा टाहो; चिखली पोलीस संशयाच्या भव-यात
पिंपरी, दि. २८ – “माझ्या बाळाला न्याय द्या हो!” असा टाहो आहे मयत दिरांश रमाकांत गादेवार या दोन वर्षांच्या बालकाच्या आई दिपाली गादेवार यांचा. पायाजवळ ठेवलेल्या वार्मर मशिनमुळे बाळाचा गुडघ्याखालचा भाग भाजून त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चिखलीतील इम्पिरिअल रुग्णालयात १८ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली होती. जवळपास वर्षभरानंतर ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेल्या अहवालात उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तीन डॉक्टर आणि दोन परिचारिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तज्ज्ञ समितीच्या म्हणण्यानुसार बाळाच्या उपचारात हलगर्जीपणा झाला आहे. मात्र पाय जळाल्याने बाळाचा मृत्यू झालेला नाही. मग बाळाचा मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल बाळाच्या आईने विचारत टाहो फोडला आहे.
घटनेचा तपशील –
मृत बालकाचे नाव दिरांश रमाकांत गादेवार (वय २) असे आहे. त्याची आई दिपाली रमाकांत गादेवार (वय ३६, रा. नेवाळेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, डॉ. जितेश मदनसिंग दाभोळ, डॉ. रजनीश जगदंबाप्रसाद मिश्रा, डॉ. रोहन प्राणहंस माळी, तसेच परिचारिका रेचल अनिल दिवे आणि सविता नंदकिशोर वरवटे या पाचांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले त्या सकाळी?
दीपाली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलाला सर्दी-ताप झाल्याने त्यांनी डॉ. दाभोळ यांच्या सल्ल्यानुसार दिरांशला चिखलीतील इम्पिरिअल हॉस्पिटल मध्ये दाखल केले. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे सातच्या सुमारास डॉ. मिश्रा आणि डॉ. माळी हे मुलाचे सॅम्पल घेण्यासाठी आले. त्यांनी आईला रुग्णकक्षाबाहेर थांबण्यास सांगितले. सुमारे तासभरानंतर आई परत आली तेव्हा तिच्या डोळ्यांसमोर भयावह दृश्य होतं. बाळाच्या पायाजवळ ठेवलेल्या वार्मर मशिनच्या उष्णतेने पाय गुडघ्याखालून पूर्ण भाजून निघाला होता. बाळ निपचित पडले होते. त्याची आई दीपाली यांनी आरडाओरडा केला असता परिचारिका आणि डॉक्टर धावून आले. त्यांनी दीपाली यांना त्या कक्षातून बाहेर काढले. आम्ही उपचार करीत असल्याचे सांगितले. बाळ श्वास घेत नाही. मात्र आमचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉक्टर सांगत होते. मला बाळाजवळ जाण्यास मनाई केली. मात्र काही वेळानंतर डॉक्टरांनी सांगितले की बाळाचा मृत्यू झाला आहे.
ससून समितीचा अहवाल
बाळाच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप बाळाची आई व इतर नातेवाइकांनी केला. नातेवाईकांच रूद्रावतार पाहून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनीही नातेवाईकाचा तक्रार अर्ज घेत सर्व कागदपत्र ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडे चौकशीसाठी सोपविण्यात आली होती. वर्षभरानंतर अहवाल प्राप्त झाला असून त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, “उपचार करताना आवश्यक दक्षता न घेतल्यामुळे बाळाला भाजण्याची इजा झाली. हे मेडिकल निग्लिजन्सचे प्रकरण आहे.” तथापि, अहवालात “पाय भाजल्यामुळे मृत्यू झाला नाही” असा उल्लेख असल्याने दिरांशच्या आईने या अहवालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आईचा आक्रोश
“वारंवार सगळं माझ्या समोर घडत होतं, पण डॉक्टरांनी मला माझ्या बाळाजवळ येऊ दिलं नाही. त्यावेळीच माझं बाळ या जगाचा निरोप घेऊन गेल होत. मग त्याच्या मृत्यूचं कारण नेमकं काय?” असा सवाल दिपाली गादेवार यांनी उपस्थित केला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, “केवळ वैद्यकिय दुर्लक्षाच्या गुन्ह्यामध्ये कमी शिक्षा आहे. वैद्यकिय दुर्लक्षामुळे माझ बाळ या जगातून कायमचे गेले आहे. मला कोणाकडून नुकसानभरपाई नकोय, पण माझ्या बाळाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना कडक शासन व्हावं हीच माझी इच्छा आहे.”
पोलिसांवरही गंभीर आरोप
“चिखली पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून एका परिचारिकेला वगळले आहे. तसेच माझ्या भावाचा आणि वडिलांचा जबाब घेतलेला नसतानाही तो घेतल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये केला आहे. असा खोटारडेपणा पोलिसांनी केला आहे.
हा प्रकार वैद्यकीय दुर्लक्षामुळे झालेल्या मृत्यूंच्या यादीत आणखी एक हृदयद्रावक प्रकरण म्हणून नोंदला गेला आहे.
आईच्या डोळ्यांतील ओल आणि “माझ्या बाळाला न्याय द्या!” हा तिचा हंबरडा सध्या चिखली परिसरात असंख्य पालकांच्या मनाला अस्वस्थ करत आहे.
त्या आठवणींमुळे घरही बदलले
मयत दिरांश याच्या आठवणी चिखली येथील घरात होत्या. याच घरात बागडणारं आपल बाळ या जगात नाही, हे मान्य करताना दीपाली यांना प्रचंड वेदना होत होत्या. त्याच्या आठवणीतून त्यांनी बाहेर पडावे यासाठी कुटुंबियांकडून वारंवार प्रयत्न होत होते. त्यासाठी कुटुंबाने त्यांचे घर बदलण्याचा निर्णय घेतला. चिखलीहून हे कुटुंब सध्या चिंचवडमध्ये वास्तव्यास आले आहे. तरीदेखील त्यांच्या बाळाच्या आठवणी जात नाहीत.















































