प्रमोद महाजन हत्येचे सनसनाटी खुलासे; प्रकाश महाजन यांनी प्रवीण-सरंगी महाजनवर केला थेट आरोप

0
171

दि.२७(पीसीबी) -दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी प्रमोद यांच्या हत्येमागे धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रमोद यांचा भाऊ प्रवीण महाजन पैशांसाठी त्यांना सतत ब्लॅकमेल करत होता आणि याच लोभ व मत्सरातून त्यांची हत्या झाली, असा सनसनाटी दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे. नुकत्याच प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना प्रकाश महाजन यांनी सारंगी यांना भूतकाळाची आठवण करून देत सडकून फटकारले.

प्रकाश महाजन यांनी गौप्यस्फोट केला की, प्रवीण महाजन प्रमोद महाजनांना पैशांसाठी ब्लॅकमेल करत होते. “प्रमोद महाजन यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. प्रवीण महाजनने भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. केवळ पैशांसाठी, लोभासाठी आणि स्वार्थासाठी हा खून झाला,” असे ते म्हणाले. या ब्लॅकमेलिंगमध्ये एका तिसऱ्या व्यक्तीचाही सहभाग होता आणि ती व्यक्ती आजही जिवंत असल्याने तिचे नाव घेत नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकाश महाजन यांच्या मते, प्रवीण महाजन स्वतः काही काम करत नव्हते, फक्त कंपन्यांकडून पगारवाढ आणि प्रमोद यांच्याकडून पैसे मागत होते. याच लोभ आणि अपराध भावनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. “त्याच्या मृत्यूचं खरं कारण हाच भूतकाळ होता,” असेही ते म्हणाले.


प्रकाश महाजन यांनी सांगितले की, प्रमोद महाजन हत्या प्रकरणात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या विरोधात साक्ष दिली होती. “त्या क्षणापासून एक वैर पेटलं, आणि आज जी बदनामी (पंकजा आणि धनंजय यांची) होत आहे, ती त्याच वैराची सावली आहे,” असा आरोप त्यांनी केला. मुंडे साहेबांनी सारंगी आणि प्रवीण यांच्या नावावर विश्वास ठेवून घेतलेल्या जमिनीवरूनच आज पंकजा मुंडे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना बदनाम केले जात असल्याचे ते म्हणाले.

सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे यांना ‘बिघडलेली मुलगी’ म्हटल्याचा समाचार घेताना प्रकाश महाजन म्हणाले, “तुम्ही परळीला जा आणि लोकांना विचारा, कोण बिघडलेलं आहे ते कळेल. वडील गेल्यावर त्या मुलीवर (पंकजावर) किती संकटं आली हे मला ठाऊक आहे. आणि तुम्ही केवळ स्वार्थासाठी तिच्यावर बोट ठेवता?”

त्यांनी सारंगी यांना जुन्या उपकारांची आठवण करून देत विचारले, “तुम्हाला गोपीनाथ मुंडेंचा फोन गेल्यावर ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळतो, प्रमोद महाजनने सांगितल्यावर अमेरिकेचा व्हिसा मिळतो, त्यावेळी तुम्हाला प्रवीण महाजन, गोपीनाथ मुंडे चालत होते? त्यांच्या मुलांची बदनामी करताना थोडी सुद्धा तुम्हाला लाज वाटत नाही का?” नवरा काही काम करत नसताना फोंडा (Fonda) सारखा महागडा वकील कसा परवडला, असा सवालही त्यांनी केला. “गावोगावी पुस्तकं घेऊन फिरता आणि इतरांच्या चरित्रावर चिखलफेक करता. ज्याची लाज वाटली पाहिजे त्याचाच अभिमान तुम्ही बाळगता,” अशा शब्दात त्यांनी सारंगी यांच्यावर हल्ला चढवला.