पिंपरी चिंचवड महापालिकेचे भांडारपाल विवेक मालशे यांची महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड
पिंपरी, दि. १९
इंडियन डेफ क्रिकेट असोसिएशन (IDCA) यांच्या वतीने दि. ३ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नवी दिल्ली येथे ९ वी नॅशनल डेफ टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे भांडारपाल विवेक मालशे यांची निवड करण्यात आली आहे.
या प्रतिष्ठित स्पर्धेत देशभरातील २० राज्यांतील संघ सहभागी होणार असून, ऐकू न येणाऱ्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा कौशल्य, आत्मविश्वास आणि संघभावनेचे उत्कृष्ट प्रदर्शन ठरणार आहे. या माध्यमातून दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर स्वतःचे स्थान निर्माण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झालेल्या विवेक माळगे यांनी २००५ साली टायगर डेफ स्पोर्ट्स असोसिएशन ही संस्था स्थापन करून ऐकू न येणाऱ्या खेळाडूंसाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपदासह उल्लेखनीय यश संपादन केले आहे. क्रिकेटच्या माध्यमातून दिव्यांग खेळाडूंना समाजमुखी ओळख मिळवून देणे हे त्यांचे ध्येय आहे.
विवेक मालशे यांची निवड महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठीही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ निश्चितच उत्कृष्ट कामगिरी करेल आणि त्यांच्या कार्यामुळे शहरातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
महानगरपालिकेच्या वतीने विवेक मालशे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, आगामी स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.