पिंपरी,दि.१७(पीसीबी)- विश्व हिंदू परिषद, विधी प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने आज पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरातील अधिवक्त्यांच्या उपस्थितीत वसुबारस, गोपाष्टमी आणि दिवाळीनिमित्त गोपूजन या विषयावर डॉ. सुभाषमहाराज गेठे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, विधी प्रकोष्ठ – प्रांत सहसंयोजक ॲड. सोहम यादव, ॲड. संकेत राव, ॲड. ऋषीकेश शर्मा, ॲड. ऋतुराज आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते.
वेदान्तचार्य डाॅ. सुभाषमहाराज गेठे यांनी आपल्या प्रवचनात, गाय ही आरोग्यदेवता असून दिवाळीची सुरुवात गोपूजनाने आपण करत असतो. तेहतीस कोटी देवतांचे स्वरूप गोमाता असून लक्ष्मीस्वरूप अशी ही गोमाता परिपूर्ण आहे. गोमातेपासून पंचद्रव्य मिळते अन् ते आपल्या आरोग्यासाठी उपयोगी ठरते. त्यातील गोमूत्र, दूध, दही, तूप, गोवर जर आपण रोजचे जीवनात वापरले तर आपले व कुटुंबाचे आरोग्य सुधारेल. आपले आरोग्य सुधारले की राज्याचे आरोग्य सुधारेल, राज्याचे आरोग्य सुधारले की राष्ट्रीय आरोग्य उंचावेल. त्यामुळे गोमातेस महाराष्ट्र राज्यात राजमाता हा दर्जा दिलेला आहे. त्याप्रमाणे दिवाळीचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील उत्सवांचे स्थान यावर त्यांनी सुंदर मार्गदर्शन केले. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करून अंध:कारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संयोजन ॲड. आशिष गोरडे, ॲड. भरत रणदिवे, ॲड. सुशांत गोरडे, मेघा कांबळे यांनी केले. प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी प्रास्ताविक केले. प्रांत सहसंयोजक, विधी प्रकोष्ठ ॲड. सोहम यादव यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. संकेत राव यांनी आभार मानले.