कोल्हापूर, दि. १४ – येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. यातील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झालाय. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आजपर्यंत एकूण 12 संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 9 जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता.
मात्र, या प्रकरणातील डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना जामीन मंजूर झाला नव्हता. जामीन न मिळाल्यामुळे तिघेही कळंबा कारागृहात होते. आज तिघांच्याही जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंच इथं सुनावणी झाली. यामध्ये तिघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. त्यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आजपर्यंतचे एकूण सर्वच 12 संशयीतांना आता जामीन मंजूर झाला आहे.
दरम्यान याच मुद्दयांवर बोट ठेवत सनातन संस्थेने निरपराध हिंदुत्वनिष्ठांची साडे नऊ वर्षांची भरपाई कोण करणार? असा सवाल केला आहे.पानसरे हत्याप्रकरणी निष्पाप हिंदुत्वनिष्ठ डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
20 फेब्रुवारी 2015 रोजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच दरम्यान अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि दक्षिणेतील विचारवंत एम. एम. कलबुर्गी, जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्येशी संबंध होता. मात्र, महाराष्ट्रातील तपास यंत्रणांना या हत्येचा तपास सुरु असताना यश आलेलं नव्हतं. जेव्हा गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक झाल्या. त्यानंतर गोविंद पानसरे हत्या प्रकरणात तपास यंत्रणांना यश मिळण्यास सुरुवात झाली होती. मात्र अखेर या प्रकरणातील सर्व संशयितांना आज जमीन मंजूर झाला आहे.