भोपालजवळ जबलपूर–इंदूर बायपास रस्त्याचा मोठा भाग कोसळला !

0
4

दि.१४(पीसीबी)-भोपाल शहराच्या उपनगरांमध्ये जबलपूर–इंदूर बायपास रस्त्याचा एक मोठा भाग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. अंदाजे ५० ते ६० मीटर लांबीचा रस्ता आणि त्यासोबत असलेली ‘रेटेनिंग वॉल’ देखील या दुर्घटनेत कोसळली आहे.सुदैवाने घटनेच्या वेळी या मार्गावर कोणतेही वाहन नव्हते, त्यामुळे प्राणहानी वा वाहनांचे नुकसान टळले आहे. प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवली आहे. त्यामुळे या परिसरात तात्पुरती वाहतूक कोंडी टाळण्यात यश मिळाले आहे.

या दुर्घटनेने प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे आणि देखभालीचे काम वेळेवर झाले नसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या बायपास रस्त्याचा उपयोग दररोज शेकडो वाहनांसाठी केला जातो, विशेषतः ट्रक आणि मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे.

स्थानिक प्रशासनाने रस्त्याच्या कोसळलेल्या भागाची पाहणी सुरू केली असून, तांत्रिक पथकांकडून चौकशी सुरू आहे. या दुर्घटनेमुळे भविष्यातील रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.