पिंपरी, दि . १२ ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड विभागात शैक्षणिक गुणवत्ता सह वृक्ष लागवड,पर्यावरण क्षेत्रात देखील नाविन्यपूर्ण कार्य करीत असलेल्या Kiddy Cove Preschool, शाहू नगर, चिंचवड या शाळेत, शाळेची शैक्षणिक गुणवत्ता तसेच शाळेत पर्यावरण संदर्भात राबविण्यात येणारे उपक्रम याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी, शाळेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्ताने Seed Mother of India म्हणजेच बीजमाता पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिल्या. या सह प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.देवा तांबे उपस्थित होते. यावेळी पर्यावरण संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला सल्लागार अंजुताई सोनवणे, मार्गदर्शक अनघा दिवाकर व संस्थेचे पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
या पर्यावरणपूरक शाळेच्या दशकपूर्ती सोहळ्याची सुरुवात वृक्षदिंडी ने पर्यावरण संरक्षण,प्रदूषण नियंत्रण,वृक्षारोपण यावर घोषणा देत करण्यात आली. या दिंडी मध्ये विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी होते. याप्रसंगी पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी उपस्थितांना देशी बियाणांचे महत्त्व,सेंद्रिय विषमुक्त शेती या सह पालकांनी मुलांना योग्य संस्कार कसे दिले जावे यावर मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या वतीने प्रमुख पाहुणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शैक्षणिक आणि पर्यावरण अशा दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या Kiddy Cove Preschool च्या प्रिन्सिपल सौ.नेहा दुग्गल व सौ.शमा राका यांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने,पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षिका या पुरस्काराने व शाळेस राष्ट्रीय आदर्श शाळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले पालक व विद्यार्थी यांनी शाळेच्या आवारात कडीपत्ता,पपई,अडुळसा,इन्सुलिन,अश्वगंधा,कोरफड,तुळस अशा एकूण १७० औषधी वनस्पती चे रोपण केले. पिंपरी चिंचवड विभागात शैक्षणिक गुणवत्ता सोबतच शाळेच्या आवारात वेगवेगळ्या औषधी वनस्पतीची लागवड करून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य,पर्यावरण,वृक्षारोपण यावर कार्य करणारी ही पहिली आदर्श शाळा आहे असे मत प्रमुख पाहुणे व उपस्थित पालक यांनी व्यक्त केले.