पिंपरी-चिंचवड प्रमाणे पुणे शहराची सूत्रे माझ्या हाती दिल्यास…

0
18

दि . ११ ( पीसीबी ) – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडसह पुण्यात घड्याळाची टिकटिक पुन्हा वाजवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. प्रत्येक मतदारसंघात नागरिकांना प्रत्यक्ष भेट देत समस्येचे निराकरण करताना दिसत आहेत. त्यामुळे शहरात अजित पवरांनी स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. अशातच, पिंपरी-चिंचवड प्रमाणे पुणे शहराची सूत्रे माझ्या हाती दिल्यास पुण्याचाही सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न राहील,असे विधान पवार यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधताना अजित पवारांनी उमेदवारीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. नांदेड येथील अविनाश लगड यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर बोलताना अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड प्रमाणे पुणे शहराची सूत्रे माझ्या हाती दिल्यास पुण्याचाही सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न राहील, मी आधी पिंपरी-चिंचवडचा विकास करून दाखविला.

मी आधी काम करतो आणि मग त्याच रस्त्याने चालायचं सांगतो, शिवशाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा आहे. मी बेरजेचे राजकारण करतो, असे विधान पवार यांनी यावेळी केलेय त्यांच्या या वक्तव्यामुळे पवार आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावरच लढविणार असल्याचे बोलले जात आहे.

जुन्या-नव्यांचा वाद न करता, जनमानसात चांगली प्रतिमा असलेले, सर्व जाती-धर्मांच्या गटांना बरोबर घेऊन जाणारे आणि समाजात मिसळून राहणारे अशा व्यक्तींनाच प्रतिनिधित्वाची संधी दिली जाईल, असंही पवार यावेळी म्हणाले.
त्यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांची धाकधूक वाढली आहे. तर काही उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.