गुन्हेगारीला ‘राजाश्रय’ देणाऱ्यांना कठोरपणे मोडून काढा

0
18

दि . ११ ( पीसीबी ) – नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला ‘राजाश्रय’ देणाऱ्यांना कठोरपणे मोडून काढा, असे निर्देश पोलीस आयुक्तांना देताना, मी त्यांना पूर्णतः मोकळीक दिली आहे. कुणी कोणत्याही पक्षाचा असो, त्याला पाठीशी घालू नका, मग तो भाजपाचा असला तरीही त्याच्यावर कारवाई करा. कुणाचा भूतकाळ काय आहे याचा विचार न करता, तो जर आता गुन्हेगारीत असेल तर त्याची गय करू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भाजपच्या (BJP) बैठकीसाठी शुक्रवारी (दि. 10) नाशकात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस आयुक्तांकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुन्हेगारी रोखण्यासाठी मी पोलीस आयुक्तांना यापुर्वीच कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार नाशिकमध्ये काही वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत.

सध्याच्या धडक कारवाईचे परिणाम दृष्टीस पडत आहेत. कारवाईत कुठलाही पक्षभेद केला जाणार नाही. नाशिकला ऐतिहासिक, धार्मिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी असून, कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले आहे.

दरम्यान, खून व गोळीबारासारख्या प्रकरणात अटक झालेल्या भाजपच्या दोन माजी नगरसेवकांवर कारवाईचा निर्णय पक्षाच्या अध्यक्षांकडून जाणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई चालविली आहे. गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या गौरव बागूल, अलीकडेच भाजपवासी झालेले बाबासाहेब उर्फ मामा राजवाडे यांना अटक झाली. दीड ते दोन महिन्यांत वेगवेगळ्या प्रकरणांत भाजपच्या दोन माजी नगरसेवकांवर कारवाई झाली. भाजपसह अन्य पक्षातील नेते, त्यांचे नातेवाईक वेगवेगळ्या प्रकरणांत अडकत आहेत. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर बोलताना मंत्री महाजन यांनी, गुंड कुठल्याही पक्षाचा असो त्याची हयगय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. पोलिसांना मुक्तहस्ते कारवाई करण्याची मुभा दिलेली आहे. त्यांच्या कामात कुणीही हस्तक्षेप करीत नाही, असे त्यांनी सांगितले. महानगरपालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींना तिकीट मिळेल का, या प्रश्नावर पक्षाकडून यावर विचार केला जाईल, असे त्यांनी नमूद केले. आम्हाला नाशिक गुंडगिरीमुक्त शहर हवे आहे. टोळ्यांची दहशत संपवायची आहे, असे देखील गिरीश महाजन म्हणाले.