छोटा राजनचा साथीदार, कुख्यात गुंड डी के राव याला खंडणी प्रकरणात पोलिसांकडून अटक

0
26

दि . ११ ( पीसीबी ) – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार डीके राव याला शुक्रवारी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खंडणी आणि धमकी प्रकरणात त्याला त्याच्या दोन साथीदार अनिल सिंग आणि मिमित भुटा यांच्यासोबत अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर तुरुंगातून खुनाचा कट रचल्याचाही आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत डीके राव याला अटक केली. त्याच्यासोबत अनिल सिंग आणि मिमित भुटा यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हे प्रकरण खंडणी आणि धमकीशी संबंधित आहे, ज्याचा संबंध मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात १.२५ कोटी रुपयांच्या व्यवहाराची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी डीके राव आणि त्याचे दोन साथीदार दक्षिण मुंबईतील सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना न्यायालय परिसरातच पकडलं. एका बांधकाम व्यावसायिकानं तक्रारदाराकडून १.२५ कोटी रुपये घेतले होते, परंतु ते परत केले नाहीत. जेव्हा तक्रारदारानं आपले पैसे मागायला सुरुवात केली, तेव्हा डीके राव आणि त्याच्या गँगनं त्याला धमक्या देण्यास सुरुवात केली. यानंतर तक्रारदारानं मुंबई पोलिसांकडं धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८ (४), ६१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

डीके राव, अनिल सिंग आणि मिमित भुटा यांना शनिवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. डीके राववर खंडणीचा आरोप पहिल्यांदा लागलेला नाही. यावर्षी जानेवारीतही त्याला सहा साथीदारांसह एका हॉटेल व्यावसायिकाकडून २.५ कोटी रुपये खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. डीके राव हा एकेकाळी छोटा राजनचा सर्वात विश्वासू सहकारी मानला जात होता.

१९९० च्या दशकात डीके राव छोटा राजन गँगमधील मोठं नाव होतं. त्याच्यावर तुरुंगातून अनेक गुन्हेगारी कारवाया केल्याचे आरोप आहेत. २००२ मध्ये छोटा राजन आणि त्याचा सहकारी ओपी सिंग यांच्यात मतभेद झाले. ओपी सिंग नाशिकच्या तुरुंगात होता आणि छोटा राजनवर त्याच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप होता. डीके राव आणि त्याच्या गँगमधील काही सदस्यांनी स्वतःला दुसऱ्या तुरुंगात हलवून ओपी सिंगच्या खुनात सहभाग घेतल्याचं सांगितलं जाते. एका अन्य घटनेत पोलिसांनी डीके रावला चकमकीत घेरलं होतं. त्यावेळी त्याचे चार साथीदार मारले गेले, पण त्यानं मृत्यूचं नाटक करून स्वतःचा जीव वाचवला.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीनं त्याला अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रत्येक वेळी बचावला. छोटा राजन परदेशात लपला असतानाही डीके राव मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात एकटा टिकून राहिला.