ॲानलाईन कफ सिरप विक्रीवर तातडीने कारवाईची मागणी

0
14

दि . ११ ( पीसीबी ) – ॲानलाईन कफ सिरप विक्रीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीचे विवेक तापकीर यांनी केली आहे.
राज्य सरकारला दिलेल्या निवेदनात ते म्हणतात, कोल्ड्रिफ सिरप प्रकरणापासून सुरू झालेला प्रवास आजही औषध विक्रेत्यांसाठी चिंता निर्माण करणारा ठरत आहे.
राज्यातील व्होलसेल व रिटेल औषध विक्रेते समाजोपयोगी कार्य करत असून, ते रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम सातत्याने पार पाडत आहेत. औषधांची गुणवत्ता तपासणी हा औषध उत्पादक कंपनींचा व प्रशासनाचा अधिकारक्षेत्रातील भाग असला, तरी औषध विक्रेते ही औषधे गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे जबाबदारीने कार्य करत आहेत. परंतु सध्या ॲानलाईन औषध विक्री प्लॅटफॉर्म्सवर कफ सिरप आणि इतर औषधांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे, तरीदेखील त्यांच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. दुसरीकडे, ऑफलाईन औषध विक्रेत्यांवर, जे प्रत्येक रुग्णास विनामूल्य समुपदेशन आणि औषधांविषयी योग्य माहिती देतात, त्यांच्या विरोधात सतत कारवाई केली जात आहे.
हे अत्यंत अन्यायकारक असून, नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या औषध विक्रेत्यांचा मनोबल खच्चीकरणारे आहे.
म्हणूनच विनंती आहे की,
१. ॲानलाईन औषध विक्रीवर तातडीने लक्ष ठेवावे.
२. कफ सिरपसह इतर संवेदनशील औषधांची ॲानलाईन विक्री त्वरित थांबवावी.
३. औषध विक्रेत्यांवरील अन्यायकारक कारवाया थांबवून समान न्याय दिला जावा.
आपण या बाबीकडे तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई कराल, अशी अपेक्षा आहे.