ठाकरे बंधुंच्या भेटीगाठींना वेग ;मनसे-शिवसेना युतीचे संकेत!

0
21

दि.१०(पीसीबी)- आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक नवा रंग भरताना दिसतोय. अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामान्य जनतेच्या मनात असलेली इच्छा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती आता प्रत्यक्षात उतरायच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंमध्ये सुसंवाद वाढलेला दिसून येतोय. त्यांच्या भेटीगाठी आणि विचारविनिमयाला वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या दहा दिवसांत संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात तब्बल तीन बैठका झाल्या आहेत. राऊत यांनी थेट ‘शीवतीर्थ’ येथे जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.

मनसे-उबाठा युतीबाबत प्राथमिक बोलणी सुरू झाल्याची माहिती आहे. ही बोलणी केवळ जागावाटपापुरती मर्यादित नसून, प्रचाराचे मुद्दे, कॉमन मिनिमम प्रोग्रॅम, आणि युतीच्या “कॅम्पेन फेस” बद्दलही चर्चा होत आहे. मनसे आणि शिवसेना (उद्धव गट) यांच्या सहकार्याने ‘नवा भिडू’ तयार करण्याचाही विचार सुरु आहे. यासाठी संजय राऊत एक मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याचे मानले जात आहे.

मुंबईत उबाठा गटाकडून वरुण सरदेसाई, अनिल परब, सूरज चव्हाण तर पुण्यात वसंत मोरे, आदित्य शिरोडकर यांच्यावर तयारीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मनसेकडून अमित ठाकरे यांनी विभागाध्यक्षांशी बैठका घेऊन बलस्थानांची चाचपणी केली आहे. शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यासोबत जागांची चर्चा देखील झाली आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे काही नेते ठाणे व पुण्यात शरद पवार यांच्या एनसीपीसोबत त्रिकोणी युती करण्याच्या शक्यतेवरही काम करत आहेत.युतीची अधिकृत घोषणा मुंबई महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय समीकरणं बदलत असताना, ठाकरे बंधुंचं मनोमिलन महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात निर्णायक भूमिका बजावू शकतं.