‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’च्या समारोपप्रसंगी रंगणार महाराष्ट्रातील नामवंत कवींचे कविसंमेलन

0
30


ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक सुजय डहाके यांचा होणार सन्मान

पिंपरी,८(पीसीबी)-पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा समारोप ९ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. या सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्रातील निमंत्रित कवींचे कविसंमेलन रंगणार आहे. तसेच ज्येष्ठ कवी, साहित्यिक रामदास फुटाणे यांना महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार मिळालेल्या ‘श्यामची आई’ चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले पिंपरी चिंचवडचे सुपुत्र सुजय डहाके यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सायंकाळी ५ वाजता होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने, तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.

या महोत्सवात साहित्यिक चर्चा, गझल, अभंग, भजन, कविसंमेलन, भारूड, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ प्रदर्शन, मराठी चित्रपट कलाकारांशी हितगुज, शाहिरी पोवाडे, एकांकिका, लोककला कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर अशा विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता या सप्ताहाचा समारोप सोहळा ९ ऑक्टोबरला प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होईल. प्रारंभी याठिकाणी सायंकाळी ४ वाजता विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ होईल. त्यानंतर सत्कार समारंभ होणार आहे.

महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी सांगितले की, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे दुपारी २ वाजता ‘संस्कृतीचा लोकरंग – अवघा रंग…संस्कृती संग’ हा लोकसांस्कृतिक कार्यक्रम होईल. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी ४ वाजता होईल. सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ कवी, साहित्यिक रामदास फुटाणे आणि सिने दिग्दर्शक सुजय डहाके यांचा सन्मान सोहळा संपन्न होईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता रामदास फुटाणे (पुणे), विठ्ठल वाघ (अकोला), नारायण पुरी (नांदेड), प्रशांत मोरे (कल्याण), निलम माणगावे (जयसिंगपूर), आबा पाटील (जत), भरत दौंडकर (शिरूर), गुंजन पाटील (छत्रपती संभाजीनगर), प्रशांत केंदळे (नाशिक), अनिल दिक्षीत (पिंपरी चिंचवड), साहेबराव ठाणगे (अहिल्यानगर) या महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या कविसंमेलनाने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा समारोप होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील गायकवाड यांनी केले आहे.